पुणे : संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त महापालिकेच्यावतीने ‘पेहेल-२०२४’ या उपक्रमाअंतर्गत विशेष अभियान हाती घेण्यात आले आहे. रविवारपासून (२५ फेब्रुवारी) शहरात अभियानाची अंमलबजावणी होणार असून त्याअंतर्गत ई-कचरा आणि प्लास्टिकचे संकलन केले जाणार आहे. त्यासाठी विविध ठिकाणी चारशेहून अधिक केंद्र उभारली जाणार आहेत. सकाळी नऊ ते दुपारी एक या कालावधीत या प्रकारच्या कचऱ्याचे संकलन केले जाणार आहे.

संत गाडगेबाबा जयंतीनिमित्त महापालिकेच्या वतीने दरवर्षी विविध पर्यावरणपूरक उपक्रम राबविण्यात येतात. यामध्ये स्वच्छता मोहीम, कचरा वर्गीकरण जनजागृती, वारंवार कचरा टाकली जाणारी ठिकाणे नष्ट करणे असे उपक्रम हाती घेण्यात येतात. यंदाही पेहेल-२०२४ या उपक्रमाअंतर्गत ई-कचरा आणि प्लास्टिकचे संकलन केले जाणार आहे. कमिन्स इंडिया, केपीआयटी आणि पर्यावरण क्षेत्रातील स्थानिक सामाजिक संस्थांच्या मदतीने हा उपक्रम राबविण्यात येणार आहे.

हेही वाचा : मनोज जरांगे आणि बारसकर महाराजांचा वाद हा वैयक्तिक, त्यात सरकारचा काडीमात्र संबध नाही – मंत्री उदय सामंत

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

या अभियानाअंतर्गत रविवारी (२५ फेब्रुवारी) संपूर्ण शहरात चारशेहून अधिक कचरा संकलन केंद्र उभारण्यात येणार आहेत. तर शनिवार (२४ फेब्रुवारी) शाळा-महाविद्यालयांमध्ये ई-कचरा आणि प्लास्टिकचे संकलन केले जाणार आहे. कचरा जनजागृती संदर्भातही विविध कार्यक्रम हाती घेण्यात येणार आहेत. अभियानाअंतर्गत संकलित झालेल्या वस्तूंची दुरुस्ती शक्य असल्यास केली जाणार असून गरजू विद्यार्थी, शैक्षणिक संस्थांना त्या भेट दिल्या जाणार आहेत. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने नोंदणीकृत केलेल्या संस्थांना उर्वरित ई-कचरा आणि प्लास्टिकचा कचरा दिला जाणार असून या संस्थांद्वारे कचऱ्यावर शास्त्रीय पद्धतीने पुनर्प्रक्रिया केली जाणार आहे. संकलित केंद्रांची यादी महापालिकेच्या संकेतस्थळावर जाहीर करण्यात आली आहे.