उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्धव – आदित्य ठाकरे यांच्यात आरोप प्रत्यारोप प्रत्यक्ष अप्रत्यक्ष सातत्याने सुरु आहेत. नुकत्याच मुंबईत संपलेल्या पावसाळी अधिवेशनातही हेच चित्र बघायला मिळाले. विधिमंडळातील विविध भाषणात तसंच पत्रकार परिषदांमध्येही टीकेचे बाण सूटत होते.
या सर्व राजकीय आरोप प्रत्यारोपा दरम्यान पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांनी ठाकरे गटाचे नेते आदित्य ठाकरे यांच्या विरोधात शहरातील विविध भागातील चौकात फलकबाजी करून आदित्य ठाकरे यांना डिवचण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. ही बॅटरी लवकरच संपणार, कारण ही ‘घराणेशाही’वर चालते, मिठी वाजवणार शिटी, मिठी मारणार मगर मिठी, कॉन्ट्रॅक्ट घेणारा “दिनो”, अंदर कौन कौन जायेगा अब सिर्फ “गिनो” अशा मजकुराचे फलक लावण्यात आले आहे. यामुळे शहरातील राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा नव्या राजकीय संघर्षाची चर्चा रंगू लागली आहे. आता या फलकबाजीला ठाकरे गटाकडून काय प्रत्युत्तर मिळते हे पाहणे जरुरीचे ठरणार आहे.
या फलकबाजी बाबत शिवसेना पुणे शहर प्रमुख नाना भानगिरे यांच्याशी संवाद साधला असता ते म्हणाले, मागील तीन वर्षाच्या कालावधीत राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राज्यभरातील शिवसैनिक आणि जनतेच्या पाठीशी उभे राहण्याचे काम केले आहे. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत शिवसेनेच्या जागा अधिक निवडून आल्या आहेत.या निवडणुकीत एकनाथ शिंदे यांना मिळालेलं यश पाहून उबाठा गटाची पायाखालची वाळू सरकली आहे. त्यातूनच त्या नेत्यांकडून आरोप केले जात आहे. पण एकनाथ शिंदे यांच्याकडे लक्ष देत नाही. ते कायम व्यस्त असतात हे आजवरच्या कृतीमधून दिसून आल्याचे त्यांनी सांगितले.
तसेच ते पुढे म्हणाले, राज्यभरातील जनतेला उबाठा गटाचा कारभार माहिती आहे. त्यामुळे जनतेने विधानसभा निवडणुकीत नाकारले आणि महायुतीच्या हाती सत्ता दिली. तसेच आता झालेल्या पावसाळी अधिवेशनामध्ये उबाठा गटाची भाषा पाहून त्यांची वैचारिक दिवाळखोरी दिसून येते. त्या भाषेला आज आम्ही उत्तर दिल्याचे त्यांनी सांगितले.