पुणे : गांजा विक्रीसाठी आलेल्या दोन तरुणांना अमली पदार्थ विरोधी पथकाने कात्रजमधील आंबेगाव परिसरात पकडले. त्यांच्याकडून चार लाख २९ हजार रुपयांचा २९ किलो गांजा जप्त करण्यात आला. अक्षय अंकुश माने (वय ३०, रा. घोरपडे पेठ), यश राजेश चिवे (वय १९, रा. दांडेकर पूल) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत. दोघांविरुद्ध अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. माने आणि चिवे हे कात्रजमधील आंबेगाव परिसरात गांजा विक्रीसाठी आले होते.
अमली पदार्थ विरोधी पथक कात्रज भागात गस्त घालत होते. त्या वेळी दोघे जण दुचाकीवरुन नायलाॅनचे पोते घेऊन निघाले होते. रस्त्याच्या कडेला दोघांनी दुचाकी लावली. दोघे जण कोणाची तरी वाट पाहत होते. त्यांच्याकडे असलेल्या पोत्यात गांजा असल्याची मााहिती तपास पथकाला मिळाली. त्यानंतर पोलिसांच्या पथकाने सापळा लावून दोघांना पकडले. त्यांच्याकडील असलेल्या पाेत्याची तपासणी करण्यात आली. पोत्यात २९ किलो गांजा सापडला. गांजा, मोबाइल संच, दुचाकी असा चार लाख ८४ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
माने आमि चिवे कोणाला गांजा विक्री करणारा होते, यादृष्टीने तपास सुरू आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त पंकज देशमुख, उपायुक्त विवेक मासाळ, सहायक आयुक्त गणेश इंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक प्रशांत अन्नछत्रे, सहायक निरीक्षक अनिल सुरवसे, पोलीस कर्मचारी दयानंद तेलंगे, प्रवीण उत्तेकर, विनायक साळवे, सर्जेराव सागर, सचिन माळवे, संदीप शिर्के, विपुन गायकवाड, विशाल दळवी यांनी ही कारवाई केली. अमली पदार्थ विरोधी पथकाने रविवारी बिबवेवाडी, कोंढवा भागात कारवाई करुन २६ लाखांचे अमली पदार्थ जप्त केले होेते. बुधवार पेठेत फरासखाना पोलिसांनी एकाकडून मेफेड्रोन जप्त केला होते.