पुणे : ‘आधुनिक युगात समाज पुढारलेला असतानाही अद्याप हुंडाबळी सारख्या घटना पहावयास मिळत आहे. वरपक्षाकडून हुंड्याची अपेक्षा ठेवली जात असल्यानेच वैष्णवी हगवणे सारखी आत्महत्याची प्रकरणे समोर येतात,’ अशी खंत खासदार डॉ. मेधा कुलकर्णी यांनी व्यक्त करत समाज परिवर्तनासाठी वेळ लागत असल्याचे स्पष्ट केले.
मोरे वेल्फेअर ट्रस्टच्या गुडविल इंडिया उपक्रमाच्या वतीने ‘गुडविल- लोकांनी लोकांसाठी चालवलेला सामाजिक उपक्रम’ या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ नवी पेठेतील एस. एम. जोशी सभागृहात पार पडला. यावेळी डॉ. कुलकर्णी बोलत होत्या. माजी खासदार अशोक मोहोळ, एअरमार्शल भूषण गोखले (निवृत्त), ज्येष्ठ साहित्यिक डॉ. सदानंद मोरे, ज्येष्ठ इतिहास अभ्यासक पांडुरंग बलकवडे, गुडविल इंडियाचे अध्यक्ष कालिदास मोरे, युनिव्हर्सल समूहाचे रोहिदास मोरे, उत्कर्ष प्रकाशनचे सुधाकर जोशी, लेखक प्रसाद घारे उपस्थित होते.
“दुसऱ्यांना मदत करण्याचा भारतीय संस्कृतीचा स्वभाव धर्म आहे आणि आपल्या संस्कृतीचे ते वैशिष्ट्य देखील आहे. गेल्या काही दिवसात जीवनमुल्ये बदलली असली, तरी वंचित आणि श्रमजीवी लोकांना आधार देण्याचे काम गुडविल संस्था करत आहे. गुडविल संस्थेने लोकांकडून कपडे गोळा करून ते गरजू लोकांपर्यंत पोहोचवले आहे,” असे गौरवोद्गारही डॉ. कुलकर्णी यांनी काढले.
“डॉ. सदानंद मोरे म्हणाले, साधुत्वाचा अंश असणारे लोक हल्ली कमी आढळतात. अशा लोकांच्या सत्कर्माचा प्रसार करून त्यांचा आदर्श घेणे अपेक्षित आहे, तर माणसाकडे खूप पैसा आल्यानंतर, तो लोकांपासून दूर जातो. जेव्हा माणूस या जगाचा निरोप घेतो त्यावेळी त्याचे सत्कर्म टिकते.” असे मोहोळ यांनी सांगितले.
बलकवडे म्हणाले, “पुण्याच्या सांस्कृतिक इतिहासात या कार्यक्रमचा उल्लेख केला जाईल आणि आज प्रकाशित झालेले ‘गुडविल- लोकांनी लोकांसाठी चालवलेला सामाजिक उपक्रम’ हे पुस्तक इतिहासाचा ठेवा म्हणून उपयोगी पडेल. कार्य कसे उभे करावे आणि कसे पुढे न्यावे यासाठी पुस्तक मार्गदर्शक ठरेल.”
मोरे वेल्फेअर ट्रस्टचा गुडविल इंडिया उपक्रम हा लोकांनी लोकांसाठी चालवलेला सामाजिक उपक्रम आहे. सोसायट्यांमधून जुने कपडे संकलित करून ते धुऊन, इस्त्री करून, कमी दरात विक्री केंद्रांमध्ये उपलब्ध करून दिले जातात. गरीब व गरजूंना अल्प किमतीत कपडे मिळावेत हा प्रमुख उद्देश आहे. या माध्यमातून महिलांना रोजगाराची संधी देण्यात आली. एकाच वेळी २ लाख ९३ हजार कपडे गोळा करून वर्ल्ड रेकॉर्ड देखील संस्थेने केला आहे, असे मोरे यांनी सांगितले.