पुणे : सोनपावलांनी गौराईचे आगमन रविवारी झाले. गौरी आवाहन झाल्यानंतर नैवेद्यासाठी लागणाऱ्या पालेभाज्यांची बाजारात रविवारी आवक वाढली. पालेभाज्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा पालेभाज्यांचे दर आवाक्यात आल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे.

गौरी आगमनानिमित्त भाजी-भाकरीचा नैवैद्य दाखविला जातो. नैवेद्यासाठी मेथी, शेपू, पालक, आंबट चुका, लाल माठ, राजगिरा या पालेभाज्यांच्या मागणीत वाढ झाली आहे. गौराईला १६ प्रकारच्या भाज्यांचा नैवेद्य दाखविला जातो. शेपू, अंबाडी, चाकवत या पालेभाज्यांच्या दरात १० ते १५ टक्क्यांनी वाढ झाली. भोपळा आणि पडवळीच्या भाजीचा देखील नैवेद्य पहिल्या दिवशी दाखविला जातो, असे श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील पालेभाजी व्यापारी राजेंद्र सूर्यवंशी यांनी सांगितले.

मार्केट यार्डातील तरकारी विभागात रविवारी एक लाख २५ हजार जुडी कोथिंबीर, मेथीच्या ६० हजार जुडींची आवक झाली. महात्मा फुले मंडई, तसेच छत्रपती शिवाजी मार्केट यार्डातील घाऊक बाजारात रविवारी सकाळी खरेदीसाठी गर्दी झाली होती. गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी पूजा झाल्यानंतर गौरीला फराळाचा नैवेद्य दाखविला जातो. गौरी पूजन सोमवारी आहे. पहिल्या दिवशी रविवारी भाज्यांचे नैवैद्य अर्पण करण्याची प्रथा आहे. मंगळवारी (२ सप्टेंबर) गौरी विसर्जन होणार आहे. उपनगरातील बाजारपेठेत रविवारी सकाळी गृहिणींनी भाजी खरेदीसाठी गर्दी केली होती. गौरी विसर्जनानंतर भाज्यांच्या मागणीत घट होईल.

गेल्या वर्षी पाऊस उशिरा सुरू झाल्याने पालेभाज्यांच्या लागवडीवर परिणाम झाला होता. गेल्या वर्षी गौरी आगमनाच्या दिवशी मेथीच्या एका जुडीचे दर ६० ते ७० रुपयांपर्यंत पोहोचले होते. सर्व पालेभाज्यांचे दर तेजीत असल्याची माहिती किरकोळ बाजारातील फळभाजी व्यापारी प्रकाश ढमढेरे यांनी दिली.

पालेभाज्यंचे जुडीचे दर

शेपू १५ ते २० रुपये

मेथी ३० ते ३५ रुपये

पालक २० ते २५ रुपये

आंबट चुका २५ ते ३०

राजगिरा २० ते २५ रुपये

कोथिंबिर २० ते २५ रुपये

गौरीचे आगमन रविवारी झाले. नैवेद्यासाठी लागणाऱ्या भाज्यांची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. मागणीच्या तुलनेत पालेभाज्यांची आवक चांगली झाल्याने यंदा गौरी आगमनाच्या दिवशी भाज्यांचे दर तुलनेने स्थिर आहेत. – राजेंद्र सूर्यवंशी, पालेभाजी व्यापारी, श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्ड

गेल्या वर्षी गौरी आगमनाच्या दिवशी पालेभाज्यांचे दर कडाडले होते. त्या वेळी पालेभाज्यांच्या दरात ३० ते ४० टक्के वाढ झाली होती. यंदा पाऊस चांगला झाल्याने फळभाज्यांसह पालेभाज्यांची लागवड चांगली झाली. यंदा पालेभाज्यांचे दर कमी असल्याने गृहिणींना दिलासा मिळाला आहे. – प्रकाश ढमढेरे, फळभाजी व्यापारी, किरकोळ बाजार