पुणे : मुंबई-बंगळुरू बाह्यवळण मार्गावरील वडगाव उड्डाणपुलावर दुचाकीस्वार तरुणाला धडक देऊन त्याच्या मृत्यूस जबाबदार अससलेल्या मोटारचालकासह चौघांना न्यायालयाने ८ मेपर्यंत पाेलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश रविवारी दिले. या प्रकरणातील मद्यधुंद मोटारचालकासह चौघांविरुद्ध सिंहगड रस्ता पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा (भारतीय न्यायसंहिता कलम १०५) गुन्हा दाखल केला.

मोटारचालक शुभम राजेंद्र भोसले (वय २७), वेदांत इंद्रसिंग राजपूत (वय २८, दोघे रा. प्राधिकरण, निगडी), श्रेयस रामकृष्ण सोळंकी (वय २५, रा. मोरे वस्ती, पिंपरी-चिंचवड), निखिल मिलिंद रानवडे (वय २६, रा. औंध गाव) अशी पोलिस कोठडी रवानगी झालेल्यांची नावे आहेत. शनिवारी पहाटे साडेतीनच्या सुमारास वडगाव उड्डाणपुलावर भरधाव मोटारीच्या धडकेत दुचाकीस्वार कुणाल मनोज हुशार (वय २३, रा. चिंचवड) याचा मृत्यू झाला. अपघातात दुचाकीवरील सहप्रवासी प्रज्योत दीपक पुजारी (वय २१, रा. चिंचवड) गंभीर जखमी झाला. कुणाल आणि प्रज्योत एका महाविद्यालयात शिक्षण घेत होते.

याप्रकरणी मोटारचालक शुभम भोसले याच्यासह त्याच्याबरोबर असलेल्या मित्रांची वैद्यकीय तपासणी करून त्यांना अटक करण्यात आली. पोलिसांनी चौघांना रविवारी न्यायालयात हजर केले. ‘आरोपी आणि अपघातात मृत्युमुखी पडलेला दुचाकीस्वार कुणाल हे पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवासी आहेत. आरोपी आणि त्यांच्यात काही वाद आहेत का, यादृष्टीने तपास करायचा आहे. आरोपींची सखोल चौकशी करायची आहे, तसेच त्यांची डीएनए चाचणी करायची आहे. तपासासाठी पोलीस कोठडी द्यावी,’ अशी विनंती सरकारी वकिलांनी केली. न्यायालयाने सरकार पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून आरोपींना ८ मेपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश दिले.