पुणे : मृत आईचे सातबारा उताऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी दोन हजारांची लाच मागणाऱ्या पुरंदर तालुक्यातील चांबळी गावच्या महिला तलाठ्यासह दोघांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) अटक केली. या प्रकरणी महिला तलाठ्यासह दोघांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणी तलाठी नीलम मानसिंग देशमुख यांच्यासह नारायण शेंडकर यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एकाने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारदाराने मृत आईचे नाव सातबारा उताऱ्यावरून कमी करण्यासाठी चांबळी गावच्या तलाठी नीलम देशमुख यांच्याकडे अर्ज केला होता. सातबारा उताऱ्यावरील नाव कमी करण्यासाठी तलाठी देशमुख यांनी शेंडकर याच्यामार्फत तक्रारदाराकडे दोन हजारांची लाच मागितली.

हेही वाचा – पुणे जिल्हा वार्षिक योजनेचा १०० टक्के निधी खर्च; आगामी वर्षाचा आराखडा १००५ कोटींचा

हेही वाचा – येरवडा कारागृहातील स्वच्छतागृहात मोबाईल संच; कारागृह प्रशासनाकडून चौकशी

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रारीची पडताळणी केली. त्यानंतर सापळा लावून शेंडकर याला तक्रारदाराकडून दोन हजारांची लाच घेताना पकडले. चौकशीत तलाठी नीलम देशमुख यांच्यासाठी लाच स्वीकारल्याचे शेंडकर याने सांगितले. त्यानंतर दोघांविरुद्ध सासवड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस निरीक्षक ज्योती पाटील तपास करत आहेत.