पुणे : युद्धजन्य परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रखर प्रकाशझोत (बीम लाइट, लेझर बीम लाइट) सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी याबाबतचा आदेश दिला आहे.लोहगाव येथे हवाई दलाचा तळ आहे. तसेच, नागरी विमानतळ आहे. विमानतळापासून १५ किलोमीटर अंतरापर्यंत प्रखर झोत सोडण्यास (वायुक्षेत्र) सोडण्यास बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारचे आदेश वेळोवेळी सहपोलीस आयुक्तांकडून देण्यात येतात. सहपोलीस आयुक्त रंजनकुमार शर्मा यांनी युद्धजन्य परिस्थिती विचारात घेऊन पुढील ६० दिवस (दोन महिने) शहर, परिसरात प्रखर झोतास बंदी घालण्याचे आदेश शुक्रवारी दिले.

वायुक्षेत्रात (एअर फिल्ड) प्रखर झोत सोडल्यास वैमानिकांचे डोळे दिपून गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर सहपोलीस आयुक्तांनी पुढील साठ दिवसांसाठी पुन्हा सुधारित आदेश दिले आहेत. या आदेशाचा भंग करणाऱ्यांविरुद्ध भारतीय नागरिक सुरक्षा संहिता २०२३ चे कलम १६३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असा इशारा सहपोलीस आयुक्त शर्मा यांनी दिला आहे.

शहरातील बंदोबस्तात वाढ

युद्धजन्य परिस्थितीमुळे शहरातील महत्त्वाच्या ठिकाणी बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. गुरुवारी पाकिस्तानने सीमावर्ती भागात क्षेपणास्त्रे डागल्यानंतर रात्रीपासून शहरातील बंदोबस्तात वाढ करण्यात आली आहे. श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपती मंदिर, विविध लष्करी संस्था, संशोधन संस्थांच्या परिसरात बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.

अफवांवर विश्वास ठेवू नका

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

समाजमाध्यमातून पसरणाऱ्या संदेशांची खातरजमा करणे गरजेचे आहे. अफवांवर विश्वास ठेवू नका, तसेच अनुचित प्रकार घडल्यास त्वरित पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी केले आहे. समाजमाध्यमातील संदेशांवर बारकाईने नजर ठेवण्यात आली आहे. सायबर सुरक्षा विचारात घेऊन समाजमाध्यमातून प्रसारित करण्यात येणाऱ्या फाइलकडे दुर्लक्ष करावे. शक्यतो अशा फाइल उघडू नयेत, असे आवाहन करण्यात आले आहे.