पुणे : राज्यात उन्हाचा तडाखा दिवसेंदिवस वाढत चाललेला असतानाच येणारा पावसाळा कसा असेल याची चिंता निर्माण करणाऱ्या एल निनोची चर्चा सुरू झाली आहे. मात्र, फेब्रुवारी-मार्च महिन्यातच एल निनोच्या प्रभावाचा अंदाज वर्तवणे हे फार लवकर असून या काळातील अंदाज सहसा चुकीचे ठरत आल्याचे संशोधनाअंती समोर आले आहे. त्यामुळेच भारतीय हवामान विभाग एप्रिल महिन्यात काय अंदाज वर्तवतो, त्याकडे लक्ष देणेच हिताचे असल्याचे हवामान क्षेत्रातील तज्ज्ञांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

एल निनो आणि ला निना या दोन परिस्थिती हवामानावर अत्यंत प्रभाव टाकणाऱ्या परिस्थिती म्हणून ओळखल्या जातात. साहजिकच भारतासाठी महत्त्वाच्या असलेल्या नैर्ऋत्य मोसमी पावसावर (मान्सून) परिणाम करणारे प्रमुख घटक म्हणून एल निनो आणि ला निना या परिस्थितीकडे जगभरातील हवामानशास्त्रज्ञांचे लक्ष असते. भारतात एल निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पाऊस होणार का, दुष्काळ पडणार का अशा चर्चा सुरू झाल्या आहेत. मात्र, एल निनोचा प्रभाव असतानाही भारतात सरासरीएवढा चांगला पाऊस झाल्याचेही अनेकदा दिसून आले आहे, त्यामुळे एल निनोचा धसका आत्ताच नको, असे हवामान शास्त्रज्ञ स्पष्ट करत आहेत.

हेही वाचा >>> पुणे : कसबा, चिंचवडमध्ये छुप्या प्रचारावर प्रशासनाचा ‘वाॅच’

ज्येष्ठ हवामान शास्त्रज्ञ डॉ. रंजन केळकर म्हणाले,की एल निनो आणि ला निना या परिस्थिती नेहमीच नैर्ऋत्य मोसमी पावसावर विपरीत परिणाम करतात असा एक प्रकारचा शिक्का त्यांच्यावर बसला आहे, मात्र त्यात तथ्य नाही. एल निनोची परिस्थिती एकूण १० वेळा निर्माण झाली असे मानले तर पन्नास टक्के वेळा म्हणजेच पाच वेळा या परिस्थितीतही उत्तम पाऊस झाल्याचे दिसून आले आहे. ला निनाचा प्रभाव हा शंभर टक्के चांगलाच असतो. या बाबत शास्त्रोक्त संशोधनही झाले आहे, त्यामुळे त्याबाबत दुमत असण्याचे काही कारण नाही.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

दुसरी बाब म्हणजे फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात एल निनो आणि ला निना बाबत आलेले अंदाज हे पुढे जाऊन बदलतात, हेही संशोधनातून समोर आले आहे. भारतीय हवामान विभागाकडून एप्रिल महिन्यात अंदाज वर्तवण्यात येतो त्याची प्रतीक्षा करावी आणि आत्ताच कोणत्याही निष्कर्षांप्रत येऊ नये, असेही डॉ. केळकर यांनी स्पष्ट केले आहे. नैर्ऋत्य मोसमी पावसावर भारताची कृषिव्यवस्था आणि त्यामुळेच अर्थकारण अवलंबून असते. एल निनो सारख्या परिस्थितीची आत्ता चर्चा करून शेतकरी वर्गामध्ये भीती निर्माण करणे योग्य नसल्याचेही डॉ. केळकर यांनी नोंदवले.