पुणे : शहरात घरफोडीच्या घटना पुन्हा वाढल्या असून, वाघोली आणि धायरी येथे सदनिकांचे कुलूप तोडून ऐवज चोरून नेल्याचे प्रकार उघडकीस आले.वाघोली भागातील एका सोसायटीतील दोन सदनिकांचे कुलूप तोडून चोरट्यांनी दोन लाख सात हजार रुपयांचा ऐवज लांबविल्याची घटना उघडकीस आली. याबाबत एका महिलेने वाघोली पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार, चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार वाघोलीतील शांभवी पॅलेस सोसायटीत राहायला आहेत. चोरट्यांनी तक्रारदार महिला, तसेच शेजारी राहणाऱ्या एकाच्या सदनिकेचे कुलूप तोडून कपाटातून दोन लाख सात हजार रुपयांचा ऐवज चोरून नेला. पोलीस उपनिरीक्षक मनोज बागल तपास करत आहेत.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

सिंहगड रस्त्यावरील धायरी भागात एका घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी १ हजार ९४० रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लांबविले. याप्रकरणी सिंहगड रस्ता पोलिसांनी चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलीस उपनिरीक्षक किशोर भोसले तपास करत आहेत.