स्वामित्व हक्क नोंदणी प्रस्तावांत ५.९ टक्के, व्यापारचिन्ह नोंदणी प्रस्तावांत १५.४ टक्के वाढ
पुणे : करोना काळात देशातील स्वामित्त्व हक्क (पेटंट) आणि व्यापारचिन्ह (ट्रेडमार्क) नोंदणीच्या प्रस्तावांत वाढ झाली आहे. त्यात स्वामित्त्व हक्क नोंदणीचे प्रस्ताव ५.९ टक्के आणि व्यापारचिन्ह नोंदणीचे प्रस्ताव १५.४ टक्क्यांनी वाढले.
जागतिक बौद्धिक संपदा संस्थेने (डब्ल्यूआयपीओ) करोना काळातील स्वामित्त्व हक्क आणि व्यापारचिन्ह नोंदणी प्रस्तावांची आकडेवारी नुकतीच जाहीर केली. २००८-०९मधील जागतिक आर्थिक संकटावेळच्या परिस्थितीच्या तुलनेत करोना काळात बौद्धिक संपदा नोंदणीचे चित्र उलट झाल्याचे दिसून आले.
जागतिक पातळीवर स्वामित्त्व हक्क नोंदणी प्रस्ताव १.६ टक्के, व्यापारचिन्ह नोंदणी प्रस्ताव १३.७ टक्के आणि अभिकल्प (डिझाईन) नोंदणी प्रस्ताव दोन टक्क्यांनी वाढल्याचे आकडेवारीत नमूद करण्यात आले आहे.
स्वामित्त्व हक्क नोंदणीचे प्रमाण २०१९मध्ये घटल्यानंतर २०२०मध्ये पुन्हा त्यात वाढ झाली. त्यात चीनमधून ६.९ टक्के, भारतातून ५.९ टक्के आणि दक्षिण कोरियातून ३.६ टक्के वाढ झाली. भारतातून ५६ हजार ७७१ स्वामित्त्व हक्क नोंदणीचे प्रस्ताव दाखल झाले. सर्वाधिक स्वामित्त्व हक्क नोंदणी प्रस्ताव दाखल झालेल्या पहिल्या दहा देशांत भारताने स्थान मिळवले आहे.
करोनाच्या आव्हानाकडे संशोधक आणि उद्योगांनी संधी म्हणून पाहिले. जैववैद्यकीय तंत्रज्ञान, माहिती तंत्रज्ञान, रिमोट सेन्सिंग अशा विविध क्षेत्रांमध्ये संशोधन करून नवसंकल्पना विकसित करण्यात आल्या, नवनवीन उत्पादने निर्माण झाली. त्यामुळे स्वामित्त्व हक्क आणि व्यापारचिन्ह नोंदणी प्रस्तावांचे प्रमाण वाढण्यास मदत झाली. मात्र स्वामित्त्व हक्क, व्यापारचिन्ह नोंदणी प्रस्तावांचे प्रमाण वाढणे आणि प्रत्यक्ष स्वामित्त्व हक्क, व्यापारचिन्ह मिळणे ही वेगळी गोष्ट आहे. पण करोना काळात संशोधन, नवसंकल्पनांना चालना मिळाल्याचे स्वागत केले पाहिजे.
– डॉ. अभय जेरे, मुख्य नवसंकल्पना अधिकारी, केंद्रीय शिक्षण मंत्रालय