scorecardresearch

दर पाच वर्षांनी ‘सेवाबाधितां’च्या संख्येत भर, सरसंघचालक मोहन भागवत यांची टीका

लोकशाही देशांमध्ये दर पाच वर्षांनी ‘सेवाबाधितां’ची संख्या एकदम उभी ठाकते. सेवेची बाधा झालेले लोक घरोघरी नमस्कार करून सेवेची संधी देण्याची मागणी करतात.

mohan bhagwat

पुणे : लोकशाही देशांमध्ये दर पाच वर्षांनी ‘सेवाबाधितां’ची संख्या एकदम उभी ठाकते. सेवेची बाधा झालेले लोक घरोघरी नमस्कार करून सेवेची संधी देण्याची मागणी करतात. त्यानंतर एका महिनाभरात ही साथ ओसरून जाते. मग हे सेवाबाधित कुठे आहेत, याचे उत्तर पुन्हा पाच वर्षांनी मिळते. त्यामुळे सेवेची प्रेरणा कोणताही स्वार्थ असू शकत नाही, असे परखड मत  सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी शनिवारी व्यक्त केले.

 धर्म म्हणजे केवळ पूजा नव्हे, तर कर्तव्य आणि स्वभाव आहे. सेवा हाच खरा माणुसकीचा धर्म आहे, असेही त्यांनी नमूद केले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समितीच्या सुवर्ण महोत्सवी वर्षांच्या सांगता वर्षांनिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघ जनकल्याण समिती, जनकल्याण सेवा फाउंडेशन आणि डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी या संस्थांनी मिळून उभारलेल्या ‘सेवा भवन’ या प्रकल्पाचे उद्घाटन मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले.

 संघाचे पश्चिम महाराष्ट्र प्रांत संघचालक नाना जाधव, जनकल्याण समितीचे प्रांताध्यक्ष डॉ. रवींद्र साताळकर, जनकल्याण सेवा फाउंडेशनचे संचालक महेश लेले आणि ‘डॉ. हेडगेवार स्मारक सेवा निधी’ संस्थेचे कोषाध्यक्ष अभय माटे या वेळी उपस्थित होते. जनकल्याण समितीच्या ५० वर्षांच्या वाटचालीचा आढावा घेणाऱ्या ‘अहर्निशं सेवामहे’ या ग्रंथाचे प्रकाशन सरसंघचालकांच्या हस्ते करण्यात आले. तसेच हरीओम काका मालशे यांचा सामाजिक कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

भागवत म्हणाले,की संकटकाळात कोणी तरी उभे राहण्याची गरज असते आणि समाज संकटात असला की त्यासाठी काही ना काही करणाऱ्या व्यक्ती समाजात असतातच. जनकल्याण समितीचे कार्य हा त्यातील एक भाग आहे. समरसता हे सेवेचे तत्त्व आहे आणि सद्भावना हा सेवेचा व्यवहार आहे. मात्र. सेवेचा परिणाम सेवा हाच आहे. सेवा करताना ‘हे आम्ही केलं’ हा अहंकार नसावा. समाज भरभरून देतो. मात्र समाजाला हे कळावे लागते की ही माणसे विश्वासार्ह आहेत.  सेवा ही मजबूरी नाही किंवा ती भीतीने होऊ शकत नाही. सेवा ही आपली सहज प्रवृत्ती आहे. माणूस म्हटले की संवेदना असतेच. हे अस्तित्वाच्या एकतेचे रहस्य आहे. हे आध्यात्मिक असले तरी वास्तविक सत्य आहे. सर्वामध्ये असलेल्या चैतन्यामुळे सेवेमध्ये करूणा हा गुण येतो,असेही भागवत यांनी सांगितले.  अभय माटे यांनी आभार प्रदर्शन केले.

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 05-03-2023 at 00:54 IST