सध्या दक्षिण आफ्रिकेचा संघ पुण्यातील गहुंजे स्टेडियमवर कसोटी मालिका खेळत आहे. या मालिकेतील दुसऱ्या कसोटीच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर आफ्रिकेच्या क्रिकेट संघातील काही खेळाडूंनी मंत भाऊसाहेब रंगारी गणपतीचे दर्शन घेतले. आफ्रिकेचा एनरिक नॉजे, जुबेर हमजा, डेन पीट आणि त्याची पत्नी, व्हर्नन फिलंडर आणि त्याची पत्नी यांनी श्रीमंत भाऊसाहेब रंगारी भवनातील दालनास भेट दिली. त्या दालनातील शस्त्रास्त्रे, अवजारे आणि फोटोंचे अवलोकन करत श्रीमंत भाऊसाहेब रंगारी यांच्याबद्दलची माहिती जाणून घेतली.
—
—
दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने केलेल्या नाबाद द्विशतकी (२५४) खेळीच्या बळावर भारताने पहिल्या डावात ६०० धावांचा टप्पा ओलांडला. भारताने ६०१ धावांवर डाव घोषित केल्यावर दुसऱ्या दिवसअखेर आफ्रिकेची अवस्था ३ बाद ३६ अशी झाली. एडन मार्क्रम, डीन एल्गर आणि टेंबा बावुमा या तिघांना दोन अंकी संख्याही गाठता आली नाही. उमेश यादवने २ तर मोहम्मह शमीने १ बळी टिपला.
त्याआधी, पहिल्या कसोटीत दोन्ही डावांत शतकं झळकावणाऱ्या रोहित शर्माला कगिसो रबाडाने स्वस्तात बाद केला. त्यानंतर मयांक-पुजारा जोडीने खेळपट्टीवर जम बसवत भारतीय डावाला आकार दिला. अर्धशतक केल्यावर चेतेश्वर पुजारा माघारी परतला. मयांक अग्रवालने मात्र मालिकेतील सलग दुसरे शतक झळकावले. त्याने १०८ धावा केल्या.
विराट कोहली आणि अजिंक्य रहाणे यांनी दुसऱ्या दिवशी ३ बाद २७३ या धावसंख्येवरून डावाला पुढे सुरूवात केली. चौथ्या विकेटसाठी अजिंक्य रहाणेसोबत कोहलीने दमदार खेळी केली. पण अर्धशतकी खेळी केल्यानंतर अजिंक्य रहाणे बाद झाला. त्यानंतर विराटने रविंद्र जाडेजाच्या सोबतीने भारताचा डाव सावरला. आफ्रिकेच्या गोलंदाजांवर प्रहार करत विराटने सातत्याने धावा जमवल्या. चहापानापर्यंत भारतीय संघाने ४ गड्यांच्या मोबदल्यात ४७३ धावांपर्यंत मजल मारली होती. तिसऱ्या सत्रात भारताकडून विराट कोहली आणि रवींद्र जाडेजा या दोघांनी तुफान फटकेबाजी केली. रवींद्र जाडेजाने १०४ चेंडूत ९१ धावांची खेळी केली. या खेळीत त्याने ८ चौकार आणि २ षटकार लगावले. पण उंच फटका मारताना तो बाद झाला आणि भारताने ५ बाद ६०१ धावांवर डाव घोषित केला.