पुणे : शालेय शिक्षण विभागाच्या अखत्यारितील अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालनालय (योजना) असे नामांतर करण्यात आले आहे. तसेच, प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडील योजना आता या स्वतंत्र संचालनालयाच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहेत. 

शालेय शिक्षण विभागाने या संदर्भातील शासन निर्णय प्रसिद्ध केला आहे. प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिकच्या योजना जिल्हा स्तरावर राबवण्याचा विचार शासनाकडून करण्यात येत होता. त्या अनुषंगाने अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण संचालनालयाचे शिक्षण संचालनालय (योजना) असे नामांतर करून अल्पसंख्याक आणि प्रौढ शिक्षण संचालनालयातील कर्मचाऱ्यांचे समायोजनही करण्यात आले. तसेच प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक संचालनालयाकडून राबवल्या जाणाऱ्या योजना आता स्वतंत्र संचालनालयाच्या माध्यमातून राबवल्या जाणार आहेत. त्यासाठी जिल्हास्तरावरील निरंतन कार्यालयातील शिक्षणाधिकाऱ्यांचे नामांतर शिक्षणाधिकारी योजना असे करण्यात आले आहे.

शिक्षण संचालनालय (योजना) या विभागामध्ये संचालक ते सुरक्षारक्षक अशी स्थायी आणि अस्थायी मिळून एकूण ५७ पदे असतील. तसेच प्राथमिक शिक्षण संचालनालयातील शालेय पोषण आहार कक्षातील स्थायी आणि कंत्राटी अशी बावीस पदे, तसेच शिक्षणाधिकारी योजना स्तरावरील स्थायी आणि अस्थायी मिळून साडेतीनशे पदे असतील. त्यामुळे आता प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयाकडील योजनांच्या अंमलबजावणीचे काम कमी होऊन ते शिक्षण संचालनालय (योजना) या कार्यालयाकडून राबवले जाईल.