पुणे : फ्रान्समध्ये झालेल्या ५५व्या आंतरराष्ट्रीय भौतिकशास्त्र ऑलिम्पियाडमध्ये भारतीय संघाने उल्लेखनीय यश मिळवले. पाच विद्यार्थ्यांचा समावेश असलेल्या भारतीय संघाने तीन सुवर्णपदकांसह एकूण पाच पदके पटकाविली असून, त्यात पुण्याच्या कनिष्क जैन या विद्यार्थ्याने सुवर्णपदकावर नाव कोरले आहे.

होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने प्रसिद्धिपत्रकाद्वारे ही माहिती दिली. १८ ते २४ जुलै या कालावधीत फ्रान्समधील पॅरिस येथे ही स्पर्धा झाली. स्पर्धेत ८७ देशांतील ४१५ विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. भारतीय संघातील पुण्याचा कनिष्क जैन, जबलपूरचा स्नेहिल झा, इंदूरचा रिद्धेश बेंडाळे यांनी सुवर्णपदक, तर सूरत येथील आगम शाह, कोटा येथील रजित गुप्ता यांनी रौप्यपदक मिळवले. सहभागी भारतीय संघाचे नेतृत्व आयआयटी खरगपूरचे प्रा. सितीकांत दास, विनायक काटदरे, डॉ. अमृता साधू, डॉ. विवेक लोहानी यांनी केले.

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पदकतालिकेत भारतीय संघाने तैवान, जपान आणि रशिया यांच्यासह संयुक्त पाचवे स्थान मिळवले. अमेरिकेच्या संघाने सर्वाधिक पाच सुवर्णपदके पटकाविली. तर दक्षिण कोरिया, चीन, हाँगकाँग यांनी प्रत्येकी चार सुवर्ण आणि एक रौप्य पदक मिळवले. भारतीय संघाने या स्पर्धेत २६व्यांदा सहभाग नोंदवला. आजवर ४२ टक्के विद्यार्थ्यांनी सुवर्णपदक, ४२ टक्के विद्यार्थ्यांनी रौप्य, तर ११ टक्के विद्यार्थ्यांनी कांस्य पदकाची कमाई केली आहे. तर गेल्या दहा वर्षांत सर्व भारतीय विद्यार्थ्यांनी सुवर्ण किंवा रौप्य पदक मिळवल्याची माहिती होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने दिली.