भांडारकर प्राच्यविद्या संशोधन संस्थेच्या अध्यक्षपदी ज्येष्ठ उद्योगपती अभय फिरोदिया यांची फेरनिवड झाली असून, ज्येष्ठ पुरातत्त्वज्ञ डॉ. प्रमोद जोगळेकर यांची उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
संस्थेची पंचवार्षिक निवडणूक बिनविरोध झाली असून, नियामक मंडळाच्या २५ सदस्यांच्या नावांची घोषणा संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये कार्यकारी मंडळाचे अध्यक्ष भूपाल पटवर्धन यांनी केली. माजी खासदार प्रदीप रावत आणि भारत फाटक यांची विश्वस्तपदी निवड झाली असून, सर्वसाधारण सभेच्या अध्यक्षपदी ॲड. सदानंद ऊर्फ नंदू फडके यांची आणि उपाध्यक्षपदी डॉ. सदानंद मोरे यांची निवड झाली आहे.
भांडारकर संस्थेच्या नियामक मंडळात २५ सदस्यांमधील सात जणांची कार्यकारी मंडळामध्ये निवड करण्यात आली. कार्यकारी मंडळाच्या अध्यक्षपदी भूपाल पटवर्धन, मानद सचिवपदी प्रा. सुधीर वैशंपायन, खजिनदारपदी संजय पवार, तर सदस्यपदी डॉ. सदानंद मोरे, श्रीनिवास कुलकर्णी, प्रा. प्रदीप आपटे आणि डॉ. मैत्रेयी देशपांडे यांची निवड झाली आहे. तर, नियामक मंडळाच्या सदस्यपदी सुश्रुत वैद्य, मंदार जोग, मनोज एरंडे, प्रा. रवींद्र मुळ्ये, संतोष रासकर, साकेत कोटीभास्कर, देवयानी कुलकर्णी, सुनील भंडगे, आशुतोष जोशी, अनिरुद्ध देशपांडे, राजेंद्र जोग, अपूर्व सोनटक्के, अरुण नहार, डॉ. शिल्पा सुमंत, सुनील त्रिंबके आणि अमित परांजपे यांची निवड करण्यात आली आहे. निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून प्रसाद जोशी आणि जितेंद्र आफळे यांनी काम पाहिले.
संस्थेची प्रकाशने वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये संस्थेच्या वार्षिक अंकाचे आणि गेल्या १०५ वर्षांत वार्षिक अंकात प्रसिद्ध झालेल्या लेखांच्या शीर्षकांचे (इंडेक्स) पुस्तक प्रकाशित करण्यात आले. त्याचबरोबर ‘भागवत पुराणाची संदर्भसूची’ या डॉ. श्रीकांत बहुलकर संपादित संशोधित ग्रंथाचेदेखील प्रकाशन या वेळी करण्यात आले. या ग्रंथामध्ये भागवत पुराणावरच्या संस्कृत टीका, आधुनिक अनुवाद, प्राकृत टीका याचा विद्वानांनी केलेला अभ्यास, नाटक, काव्य, गद्यरचना आदी लेखनाचा समावेश आहे. संस्थेच्या ‘भारतविद्या’ या ऑनलाइन अभ्यासक्रमाची माहिती देणाऱ्या वेबपोर्टलची माहिती गौरी मोघे यांनी दिली.