मॉडेल कॉलनीमधील चित्तरंजन वाटिकेत सुरू झालेल्या माहिती अधिकार कट्टय़ाला उत्तम प्रतिसाद मिळत असून असे कट्टे शहरात आणखी काही ठिकाणी सुरू केले जाणार आहेत. माहिती अधिकार कट्टा मॉडेल कॉलनीबरोबरच रविवार (१२ जानेवारी) पासून सॅलिस्बरी पार्क येथेही सुरू होत आहे.
चित्तरंजन वाटिका येथे दर रविवारी सकाळी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत माहिती अधिकार कट्टा (संपर्क: श्यामला देसाई- ९८२३४५९८८१) चालवला जात आहे. त्याबरोबरच सॅलिस्बरी पार्क परिसरातील भिमाले उद्यानातही दर रविवारी साडेनऊ ते साडेदहा या वेळेत (संपर्क: स्नेहा दामले ९५५२५२३८००) हा कट्टा आता सुरू होणार आहे. त्यापुढील टप्प्यात विमाननगर येथे १ फेब्रुवारी पासून (संपर्क: कर्नल दळवी- ९८६०५७७३६४) सायंकाळी साडेपाच ते साडेसहा या वेळेत माहिती अधिकार कट्टा सुरू होणार असल्याचे उपक्रम संयोजक विजय कुंभार यांनी सांगितले.
या उपक्रमात कोणीही मार्गदर्शक बनून न येता आपसातील चर्चेतून गरजूंना आवश्यक ते मार्गदर्शन मिळणे अपेक्षित आहे. कट्टय़ावर माहिती अधिकाराबाबत मते मांडता येतील, चर्चा करता येईल, अडचणी मांडता येतील. प्रत्येक नागरिक माहिती अधिकार कायद्याबाबत सबल, आत्मनिर्भर व्हावा हा या उपक्रमामागील हेतू असल्याचेही सांगण्यात आले.