अक्षर कसं मोत्यासारखं असावं, असं सांगत शिक्षक लिहिण्याचा सराव करायला लावायचे. विशेषतः अक्षर गोल आणि सुवाच्च कसं येईल यासाठी शाईचे पेन वापरण्याचे आदेशही सोडायचे. हे सगळं आता सांगण्याचं कारणं म्हणजे शाईच्या पेनाच्या आठवणी लख्ख डोळ्यासमोर याव्यात असं प्रदर्शन पुण्यात भरलंय. “द पुणे फाऊंडेशन पेन शो २०१९” च्या वतीने १३ देशातील दीडशे ते तीन लाखांपर्यंत किंमतीचे शाईचे पेन प्रदर्शनात ठेवण्यात आले असून, पुणेकरांसाठी ही अनोखी पर्वणीच ठरली आहे.
आताच्या काळात प्रत्येक ग्राहकाची आवडीनिवडी लक्षात घेऊन, पेन निर्मिती करणाऱ्या अनेक कंपन्या बाजारात आल्या. अगदी पाच रुपयांपासून त्यांची किंमत सर्वसामान्य व्यक्तीला घेता येईल, अशा दरात बाजारात पेन उपलब्ध झाले. पण यामध्ये आज देखील शाईच्या पेनविषयी प्रत्येकाच्या मनात एक वेगळं स्थान आहे. त्यामुळे अनेक व्यक्तींच्या खिशाला शाईचा पेन दिसतो. हीच बाब हेरून पुण्यात “द पुणे फाऊंडेशन पेन शो- २०१९” च्या वतीने आपटे रोडवरील श्रेयस बॅंक्वेट हॉलमध्ये शाईच्या पेनाचे प्रदर्शन आयोजित करण्यात आले आहे. हे प्रदर्शन १ ऑक्टोबरपर्यंत सुरू राहणार आहे. पुण्यात प्रथमच शाईच्या पेनचे प्रदर्शन असल्याने, पुणेकरांनी सकाळपासून गर्दी केली होती. अशाप्रकारचं पेनचं प्रदर्शन पुण्यात पाहिल्यांदा होत असून, यामध्ये १५० रुपयांपासून ते साडे तीन लाख रूपये किंमतीचा पेन प्रदर्शनात ठेवण्यात आला आहे. १५० रुपयांपासून सुरूवात होऊन आठ हजार, ४० हजार, दोन लाख आणि तीन लाख ५० हजार रुपये आदी श्रेणीतील पेन पाहण्यास मिळत आहे. काही पेन सोन्याचे आहे.
महत्त्वाची गोष्ट म्हणजे टचस्क्रीनच्या प्रभावाखाली असलेल्या सध्याच्या पिढीतील तरूणही या प्रदर्शनात शाईचे पेन न्याहाळताना दिसत आहे. तर उतारवयाकडे झुकलेल्या ज्येष्ठानीही या प्रदर्शनाला चांगलीच गर्दी केली आहे. या प्रदर्शनाविषयी बोलताना प्रदर्शनाच्या आयोजिका रश्मी नगरकर-पिल्ले म्हणाल्या, “मी इयत्ता चौथीपासून शाईचे पेन वापरते. तेव्हापासून माझ्याजवळ शाईचे पेन असून, या पेनने लिखाण करण्याचा आनंद वेगळाच आहे. या पेनाचा वापर अधिक प्रमाणात व्हावा. आताच्या पिढीमध्ये शाईच्या पेनविषयी आवड निर्माण व्हावी. हे प्रदर्शन आयोजित करण्यामागे आमचा उद्देश आहे,” असं त्या म्हणाल्या.