पुणे : वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिकेअंतर्गत संगमवाडी रेल्वे क्राॅसिंग येथे स्टील गर्डर बसविण्याचे आव्हानात्मक काम पूर्ण झाल्याने वनाज ते रामवाडी मेट्रो मार्गिकेचे महत्त्वाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे, या संपूर्ण मार्गिकेवर मेट्रोची चाचणी घेण्याचा मार्गही मोकळा झाला आहे.
मेट्रो प्रकल्पाअंतर्गत शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय ते रामवाडी स्थानक या टप्प्यातील कामे महामेट्रोकडून सुरू होती. या मार्गावरील महत्त्वाचा टप्पा पूर्ण झाला आहे. मार्गिकेवरील संगमवाडी रेल्वे क्राॅसिंग येथील स्टील गर्डर बसविण्याचे काम पूर्ण झाल्याची माहिती महामेट्रोकडून देण्यात आली. या कामासाठी रेल्वे प्रशासनाकडून मेट्रोच्या कामासाठी दोन आणि तीन जानेवारी रोजी रेल्वे थांबवून मेट्रोला ब्लाॅक देण्यात आला होता. या कालावधीत मेट्रोच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी आव्हानात्मक काम पूर्ण केले.
मार्गिकेवर बसविण्यात आलेला स्टील गर्डर दोन भागांमध्ये बसविण्यात आला. या स्टील गर्डरची एकूण लांबी ४५ मीटर असून त्याच्या एका भागाचे वजन ११५ मेट्रिक टन एवढे आहे. गर्डर बसविण्यासाठी अत्याधुनिक क्रेनचा वापर करण्यात आला. या क्रेनची क्षमता ४०० मेट्रिक टन एवढी असून मेट्रोच्या कामामध्ये प्रथमच एवढ्या मोठ्या क्षमतेच्या क्रेनचा वापर करण्यात आला. दोन्ही गर्डर बसविण्यात आल्याने वनाज ते रामवाडी स्थानक या मार्गिकेवरील महत्त्वाचे काम संपले असून, येत्या काही दिवसांत मेट्रोची चाचणी या मार्गावर घेतली जाईल, अशी माहिती महामेट्रोकडून देण्यात आली.
शिवाजीनगर जिल्हा सत्र न्यायालय इंटरजेंच स्थानक ते रामवाडी स्थानक या मार्गाचे व्हायाडक्टचे काम नव्वद टक्के पूर्ण झाले आहे. येत्या काही महिन्यांत व्हायाडक्टचे काम पूर्ण होईल. मार्गावरील मेट्रो स्थानकांचे काम देखील प्रगतिपथावर आहे. या मार्गामुळे मेट्रोचे पुणे रेल्वे स्थानक, वाडिया महाविद्यालय चौक, बंडगार्डन, कल्याणीनगर आणि रामवाडी मेट्रोला जोडले जाणार आहेत, असे महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डाॅ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले.
हेही वाचा – पुणे जिल्हा नियोजन समितीवर वर्णी लागण्यासाठी इच्छुकांची भाऊगर्दी
मेट्रोच्या पहिल्या टप्प्यात पिंपरी-चिंचवड ते स्वारगेट हा सतरा किलोमीटर लांबीचा, तर वनाज ते रामवाडी हा सोळा किलोमीटर लांबीचा अशा या दोन मार्गिकांची कामे सध्या प्रगतिपथावर आहेत. यातील पिंपरी-चिंचवड महापालिका स्थानक ते फुगेवाडी या सात किलोमीटर, तर वनाज ते गरवारे महाविद्यालय या पाच किलोमीटर अशा बारा किलोमीटर अंतराच्या टप्प्यात मेट्रोची प्रवासी सेवा सुरू झाली आहे. पुणे मेट्रोचे ८५ टक्के काम पूर्ण झाले असून २१ किलोमीटर लांबीच्या मार्गाची कामे वेगाने सुरू आहेत.