‘महावितरण’ कडे सुरक्षा ठेव म्हणून जमा असलेल्या रकमेवरील व्याजापोटी पुणे परिमंडलातील सुमारे वीस लाख ग्राहकांना ५७ कोटी ३० लाखांचा परतावा देण्यात आला आहे. व्याजाची ही रक्कम ग्राहकांच्या वीजबिलांमध्ये समायोजित करण्यात आली आहे, असे ‘महावितरण’ कडून कळविण्यात आले आहे.
राज्य विद्युत नियामक आयोगाच्या निर्देशानुसार सर्व वर्गवारीतील वीजग्राहकांनी सुरक्षा ठेव जमा करणे बंधनकारक आहे. या ठेवीवर कालावधीनुसार ९.५ टक्क्य़ांपर्यंत व्याज देण्याबाबतही आयोगाचे निर्देश आहेत. त्यानुसार पुणे विभागातील लघुदाब वीजग्राहकांना ३० कोटी १० लाख रुपयांच्या व्याजाचा परतावा करण्यात आला आहे. त्याचप्रमाणे सुमारे साडेतीन हजार उच्चदाब वीजग्राहकांना सुरक्षा ठेवीवरील व्याजाचे २७ कोटी २० लाख रुपये समायोजित करण्यात आले आहेत.
एका आर्थिक वर्षांतील एका महिन्याच्या सरासरी बिलाइतकी रक्कम सुरक्षा ठेव म्हणून जमा केली जाते. वीजदर व वीजवापर वाढल्यास त्यानुसार सुरक्षा ठेवीची रक्कमही वाढते. त्यानुसार एप्रिल महिन्यामध्ये पुणे विभागातील ग्राहकांना सुरक्षा ठेवीच्या फरकाच्या रकमेचे बिल देण्यात आले आहे. काही ग्राहकांनी अद्यापही ही सुरक्षा ठेवीची रक्कम भरलेली नाही. या वीजग्राहकांनी या रकमेचा भरणा करावा, असे आवाहन ‘महावितरण’ कडून करण्यात आले आहे.