पुणे : आंतरराष्ट्रीय रसायनशास्त्र ऑलिंपियाडमध्ये (आयसीएचओ) भारताने उल्लेखनीय यश मिळवले. या स्पर्धेत सहभागी झालेल्या चार भारतीय विद्यार्थ्यांनी पदके पटकावली असून, राज्यातील देवेश पंकज भय्या या विद्यार्थ्याने सुवर्णपदकावर नाव कोरले.
होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राने प्रसिद्धीपत्रकाद्वारे ही माहिती दिली. ५ ते १४ जुलै २०२५ दरम्यान दुबई येथे ही स्पर्धा झाली. यंदा या स्पर्धेचे ५७वे वर्ष होते. त्यात भारतीय संघाने दोन सुवर्ण आणि दोन रौप्य पदकांची कमाई केली. त्यात जळगाव येथील देवेश पंकज भय्या आणि हैदराबाद येथील संदीप कुची यांनी सुवर्ण, तर भुवनेश्वर येथील देबदत्त प्रयदर्शी, नवी दिल्ली येथील उज्ज्वल केसरी यांनी रौप्यपदक मिळवले.
यंदा या स्पर्धेत ९० देशांतील ३५४ विद्यार्थ्यांनी भाग घेतला होता. पदक यादीत भारत सहाव्या क्रमांक राहिला. भारतीय चमूचे नेतृत्व प्रा. अंकुश गुप्ता (मुंबई), प्रा. सीमा गुप्ता (दिल्ली), डॉ. नीरजा दशपुत्रे (पुणे) आणि डॉ. अमृत मित्रा (पश्चिम बंगाल) यांनी केले.
विद्यार्थ्यांची उज्ज्वल कामगिरी
स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांची निवड आणि प्रशिक्षण होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्राच्या माध्यमातून केले जाते. गेल्या २६ वर्षांतील सहभागामध्ये ३० टक्के विद्यार्थ्यांनी सुवर्ण, ५३ टक्के विद्यार्थ्यांनी रौप्य आणि १७ टक्के विद्यार्थ्यांनी कांस्यपदके मिळवली आहेत, अशी माहिती देण्यात आली.