नोकरदार महिलांसाठी पोलिसांची ‘बडी कॉप’ योजना
रात्री-अपरात्री कामावरून घरी निघालेल्या नोकरदार महिलांच्या सुरक्षिततेसाठी पुणे पोलिसांकडून जागतिक महिला दिनाच्या पाश्र्वभूमीवर ‘बडी कॉप’ ही योजना सुरू करण्यात आल्याची घोषणा पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांनी मंगळवारी केली. नोकरदार महिलांना संकटकाळी तातडीने मदत मिळावी, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. पोलीस हे मित्राप्रमाणे संकटकाळात मदतीसाठी उभे राहतील, असे पोलीस आयुक्त शुक्ला यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
‘‘पुणे पोलिसांच्या सायबर गुन्हे शाखेच्या पुढाकाराने ‘बडी कॉप’ योजना सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी तंत्रज्ञ पंकज घोडे यांनी सहकार्य केले आहे. संगणक अभियंता अंतरा दास आणि रसिला ओपी यांचा खून झाल्याच्या घटनेनंतर नोकरदार महिलांच्या सुरक्षितेतविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले होते. माहिती-तंत्रज्ञान क्षेत्रात या घटनेचे पडसाद उमटले होते. त्यामुळे मी हिंजवडी इंडस्ट्रिअल असोएिशनच्या पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली होती. हिंजवडीतील आयटी क्षेत्रात काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांची प्रत्यक्ष जाऊन भेट घेतली. ‘वॉक विथ सीपी’ हा उपक्रम देखील हिंजवडीत राबविण्यात आला होता. आयटी क्षेत्रातील महिलांचे काम, स्वरूप पाहता त्यांना रात्री-अपरात्री तातडीने मदत मिळावी, या हेतूने ‘बडी कॉप’ योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला,’’ असे शुक्ला यांनी सांगितले. या प्रसंगी सहपोलीस आयुक्त सुनील रामानंद, सायबर गुन्हे शाखेचे पोलीस उपायुक्त दीपक साकोरे, सहायक आयुक्त सुरेश भोसले, अरुण वालतुरे, पोलीस निरीक्षक राधिका फडके उपस्थित होते.
शुक्ला म्हणाल्या, की ‘बडी’ या इंग्रजी शब्दाचा अर्थ मित्र असा होतो. पोलिसांकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून पाहिले जाते. शेवटी पोलीस हे नागरिकांचे मित्र आहेत. विशेषत: संकटकाळी महिलांच्या मागे पोलिसांनी उभे राहावे, या हेतूने ही योजना सुरू करण्यात आली आहे. पोलिसांकडून महिलांसाठी पुणे पोलिसांच्या संकेतस्थळावर ‘माय कम्प्लेंट’ शीर्षकाखाली महिलांच्या तक्रारी स्वीकारण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. महिलांसाठी ‘१०९१’ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध करून देण्यात आला आहे. ‘बडी कॉप’ योजनेंतर्गत प्रत्येक पोलीस ठाण्यातील महिला आणि पुरुष पोलीस शिपायांचा समावेश राहणार आहे. त्यांचा व्हॉट्स अॅप समूह सुरू करण्यात येणार आहे. या समूहात नोकरदार महिलांचा समावेश केला जाणार आहे. या समूहाच्या माध्यमातून एखादी तक्रार आल्यास संबंधित समूहाच्या प्रमुखाने म्हणजेच पोलीस शिपायाने तातडीने कार्यवाही करणे गरजेचे आहे.
‘बडी कॉप’ अॅप देखील सुरू होणार आहे. शहराच्या एखाद्या भागात महिलेवर काही प्रसंग ओढावल्यास ती तातडीने नजीकच्या पोलीस ठाण्याचा क्रमांक अॅपद्वारे मागवू शकते. त्या भागातील पोलीस ठाण्याचा क्रमांक त्वरित महिलेला उपलब्ध होईल. तिने मोबाइलवरून केलेला दूरध्वनी तातडीने पोलीस ठाण्याला जाईल. पोलीस ठाण्यात प्रतिसाद मिळाला नाही अथवा तेथील क्रमांक व्यस्त असल्यास संबंधित पोलीस ठाण्याच्या अखत्यारित असलेल्या ‘बडी कॉप’ समूहाच्या पोलिसांकडे जाईल. त्याने देखील प्रतिसाद दिला नाही तर त्या महिलेच्या तक्रारीचा दूरध्वनी थेट संबंधित पोलीस ठाण्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक, सहायक आयुक्त आणि पोलीस उपायुक्त दर्जाच्या आधिकाऱ्यापर्यंत पोहचेल. कोणत्याही परिस्थितीत महिलेच्या तक्रारीचे निवारण करण्याच्या सूचना दिल्या आहेत.