‘मी गाणारा कवी असलो, तरी तुम्ही श्रोते मूक रसिक आहात,’ असे कविवर्य मंगेश पाडगावकर यांनी म्हटले आहे. त्यानुसार प्रत्येकामध्ये एक कलावंत दडलेला असतो. त्यातील काहींना संधी मिळते. तर, काही संधीअभावी केवळ प्रेक्षकाची भूमिका बजावतात. अशा प्रेक्षकांना रंगमंचावर आणण्याच्या उद्देशातून त्रिवेणी फाउंडेशनतर्फे आशियाना करंडक ही आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धा आयोजित केली आहे. बुधवारपासून (१० डिसेंबर) ते रविवापर्यंत (१४ डिसेंबर) राष्ट्र सेवा दलाच्या सानेगुरुजी स्मारक येथे ही स्पर्धा होणार आहे.
वाडा संस्कृती ही एके काळच्या पुण्याची ओळख काळाच्या ओघात लुप्त पावत चालली आहे. या वाडय़ांची जागा आता फ्लॅट संस्कृतीने घेतली आहे. गेल्या तीन दशकांत शहरामध्ये मोठमोठय़ा सोसायटय़ा आकाराला आल्या आहेत. या सोसायटय़ांमध्ये वास्तव्यास असलेले नागरिक घरामध्ये आपल्याच कोशात वावरत असले, तरी गणेशोत्सव, नवरात्र, कोजागरी पौर्णिमा अशा माध्यमातून हे सारे एकत्र येत स्नेहमेळाव्याचा आनंद लुटतात. अशा सोसायटी उपक्रमांतून अनेकांना आपल्या कलागुणांचा आविष्कार करण्याची संधी मिळते. अशा कलाकारांना आपल्या कलेचे दर्शन घडविण्यासाठी व्यासपीठ मिळावे आणि समाजातील वातावरण सौहार्दपूर्ण राहावे या उद्देशातून आशियाना करंडक ही आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.
कला आणि सांस्कृतिक क्षेत्रात काम करणाऱ्या रश्मिता शहापूरकर, प्रियांका इनामदार आणि अर्चना संजय या तीन महिलांनी कलाकारांच्या मदतीने हे त्रिवेणी फाउंडेशन स्थापन केले आहे. ज्येष्ठ अभिनेते डॉ. श्रीराम लागू, दीपा श्रीराम, सुमित्रा भावे, सुनील सुकथनकर, अतुल परचुरे, अच्युत गोडबोले, शरद पोंक्षे, डॉ. शेखर कुलकर्णी असे मान्यवर त्रिवेणी फाउंडेशनच्या सल्लागार मंडळामध्ये असून सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून ते एकत्र आले आहेत. स्पर्धेच्या पहिल्याच वर्षी १२ सोसायटी संघांनी सहभाग घेतला असून १० ते १२ डिसेंबर या कालावधीत स्पर्धेची प्राथमिक फेरी होणार आहे. १४ डिसेंबर रोजी स्पर्धेची अंतिम फेरी होणार असून त्यानंतर अभिनेते गिरीश कुलकर्णी यांच्या हस्ते विजेत्या कलाकारांना पारितोषिके प्रदान केली जाणार आहेत.
नाटक जोडणारे माध्यम
बालगटापासून ते महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आंतरशालेय नाटय़स्पर्धा, पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया करंडक, विनोदोत्तम करंडक, तालीम करंडक अशा विविध स्पर्धा शहरामध्ये होत असतात. आता तर, पुणे महापालिकेनेही नाटय़स्पर्धा घेण्याचे ठरविले आहे. अशा परिस्थितीमध्ये आणखी एक स्पर्धा एवढेच या आंतरसोसायटी एकांकिका स्पर्धेचे स्वरूप नाही. तर, नाटक हे सर्वाना जोडणारे माध्यम आहे. शहरातील विविध सोसायटींमध्ये वास्तव्य करणाऱ्या लोकांमध्ये बंधुभाव निर्माण होऊन त्यांच्यात एकजुटीची भावना वाढीस लागावी हा स्पर्धेचा उद्देश आहे. एकांकिका ४५ मिनिटांची असली, तरी त्याची रंगीत तालीम करण्यासाठी हे सोसायटीतील कलाकार किमान महिनाभरापासून तयारी करीत असल्याची माहिती रश्मिता शहापूरकर यांनी दिली.