दिवाळीनिमित्त परवागी जाण्यासाठी एसटी स्थानकाच्या आवारात आलेल्या प्रवाशांना गाठण्यासाठी खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी दलाल नेमले असून, त्यांचा वावर वाढला आहे. या दलालांकडून प्रवाशांची फसवणूक करण्यात येत असल्याचेही निदर्शनास आले आहे. त्यांना अटकाव करणाऱ्या स्वारगेट एसटी स्थानकातील नियंत्रकाला शिवीगाळ करुन धक्काबुक्की केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी चौघाविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

स्वारगेट, पुणे रेल्वे स्थानक; तसेच शिवाजीनगरमधील वाकडेवाडी स्थानक परिसरात खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या दलालांचा वावर असतो. या दलालांचे प्रमाण वाढले आहे. आता दलालांकडून दमदाटी करण्याचे प्रकार घडत आहेत. स्वारगेट पोलिसंनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. किशोर नागटिळक, विशाल राठी, पवार आणि कुमार निकंब या दलालांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. स्वारगेट एसटी स्थानकातील प्रवासी नियंत्रक नामदेव बाळासाहेब कारले (वय ५२, रा. कात्रज) यांनी स्वारगेट पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.

हेही वाचा : Video: सळई चोरल्याच्या आरोपावरून भंगार गोळा करणाऱ्या व्यक्तींना बेदम मारहाण

स्वारगेट एसटी स्थानकात चोरट्यांचा वावर आहे. सणासुदीच्या काळात चोरटे प्रवाशांकडील ऐवज लांबवितात. प्रवाशांनी त्यांचा मौल्यवान ऐवज सांभाळावा, असे आवाहन ध्वनिवर्धकावरुन केले जाते. कारले ध्वनीवर्धकांवरुन प्रवाशांना सूचना देण्याचे काम करतात. एसटी स्थानकाच्या आवरात खासगी प्रवासी वाहतूकदारांच्या दलालांचा वावर असून, प्रवाशांची फसवणूक होण्याची शक्यता आहे. दलालांपासून सावध रहा, असे आवाहन कारले यांनी केले. त्या वेळी एसटी स्थानकाच्या आवारात असलेले दलाल नागटिळक, राठी, पवार आणि निकंब हे कारले यांच्या केबीनमध्ये शिरले. त्यांना शिवीगाळ करुन धक्काबुक्की केली. चौघांनी कारले यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी दिली. सरकारी कामात अडथळा आणणे, धमकावणे, शिवीगाळ तसेच मारहाण केल्या प्रकरणी चौघा दलालांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक जगताप तपास करत आहेत.

हेही वाचा : निवृत्त सरकारी अधिकारी महेश झगडे यांचा कस्तुरबा रुग्णालयाला मदतीचा हात

अशी करतात प्रवाशांची फसवणूक

खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदारांनी नेमलेले दलाल हे प्रवाशांना गाठून एसटी बसपेक्षा तिकिटाचे दर कमी असल्याचे सांगतात. त्यानंतर प्रवाशांना एसटी स्थानकापासून दूर नेण्यात येते. त्या ठिकाणी गाडी उभी असते. त्या गाडीमध्ये असलेल्या आसन क्षमतेेपेक्षा जास्त प्रवासी गाडीमध्ये बसविण्यात येतात. गाडी भरेपर्यंत प्रवाशांना तिष्ठत थांबावे लागते. तसेच तिकिटाचे दरही जास्त असतात, असे काही प्रवाशांकडून सांगण्यात आले.

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Intrusion of brokers in the premises of st stations swargate bus stand case against 4 peoples pune print news tmb 01
First published on: 24-10-2022 at 17:24 IST