पुणे शहरात स्थानिक संस्था कर (लोकल बॉडी टॅक्स- एलबीटी) लागू झाल्यानंतर आजपर्यंत ज्या व्यापाऱ्यांनी/व्यावसायिकांनी एक रुपयाही एलबीटी भरलेला नाही, अशांकडे तपासणी तसेच दंडवसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून ज्या व्यावसायिकांनी नोंदणी केलेली आहे अशांनी घाबरण्याचे कारण नाही, असे महापालिकेतर्फे कळवण्यात आले आहे.
एलबीटीसाठी नोंद न करणाऱ्या तसेच एलबीटी न भरणाऱ्या व्यावसायिकांकडे तपासणी तसेच दंडवसुली सुरू करण्यात आली असून गेल्या पाच दिवसांत अनेक व्यावसायिकांकडून लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात आला असल्याचे महापालिकेचे सहआयुक्त आणि स्थानिक संस्था करप्रमुख प्रमुख विलास कानडे यांनी सोमवारी सांगितले. जे व्यावसायिक नियमितपणे कराचा भरणा करत आहेत, त्यांनी घाबरण्याचे कारण नाही. मात्र, ज्या व्यावसायिकांनी व्यवसायाची नोंदणी केलेली नाही, नोंदणी केलेली आहे; पण एलबीटीचा भरणा केलेला नाही, अशांवर धडक कारवाई सुरू राहणार असल्याचे ते म्हणाले. व्यावसायिकांनी कोणत्या दक्षता घेणे आवश्यक आहे तेही महापालिकेने स्पष्ट केले आहे.
शहरातील ज्या व्यापाऱ्यांची/व्यावसायिकांची वार्षिक खरेदी एक लाख किंवा खरेदी-विक्रीची उलाढाल पाच लाख वा त्यावर असेल, अशांनी एलबीटीसाठी नोंदणी करणे बंधनकारक आहे. तसेच मूल्यवíधत कर अधिनियम २००२ मधील तरतुदीनुसार निश्चित केलेल्या दिनांकापासून संबंधित प्रत्येकाला व्यापारी/व्यावसायिक मानण्यात आले असून त्यांना एलबीटी नोंदणी देण्यात आलेली आहे, असे कळवण्यात आले आहे.
एलबीटीतील नियम १३ अनुसार सर्व व्यापारी/व्यावसायिकांनी त्यांना देण्यात आलेले व्यवसायाचे नोंदणी प्रमाणपत्र व्यवसायाच्या ठिकाणी दर्शनी भागात ठळकपणे दिसेल अशा पद्धतीने लावणे बंधनकारक आहे. तसेच बिलांवर एलबीटी क्रमांक छापलेला असणेही बंधनकारक असल्याचे महापालिकेने कळवले आहे. प्रत्येक व्यावसायिकाने चालू महिन्याचा एलबीटी पुढील महिन्याच्या दिनांक २० पूर्वी महापालिकेने नियुक्त केलेल्या बँकेमध्येच भरणे आवश्य आहे. अन्यथा देय रकमेवर दोन टक्के दराने व्याजाची आकारणी केली जाईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.
‘पूना आयर्न’चा विरोध
दरम्यान, दुकानात जाऊन तपासणी करण्याची जी कारवाई महापालिकेने सुरू केली आहे त्याला दि पूना आयर्न अॅन्ड स्टील मर्चन्ट्स असोसिएशनने विरोध केला आहे. कायदा लागू करताना देण्यात आलेल्या आश्वासनाचा हा भंग आहे. त्यामुळे बेमुदत बंद करून या कारवाईला विरोध केला जाईल, असा इशारा संघटनेचे अध्यक्ष घनश्याम सुराणा यांनी प्रसिद्धिपत्रकाद्वारे दिला आहे.
संग्रहित लेख, दिनांक 26th Nov 2013 रोजी प्रकाशित
तपासणी मोहीम आजवर ‘एलबीटी’ न भरलेल्यांकडे
आजपर्यंत ज्या व्यापाऱ्यांनी/व्यावसायिकांनी एक रुपयाही एलबीटी भरलेला नाही, अशांकडे तपासणी तसेच दंडवसुलीची मोहीम हाती घेण्यात आली असून ज्या व्यावसायिकांनी नोंदणी केलेली आहे अशांनी घाबरण्याचे कारण नाही.
First published on: 26-11-2013 at 02:42 IST
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Investigation campaign for those who not paid lbt