गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी मध्यरात्री शहरात विशेष मोहीम (कोम्बिंग ऑपरेशन) राबवून गुंडांची झाडाझडती घेतली. शहरातील वेगवेगळ्या भागात राहणाऱ्या तीन हजार २९५ सराईतांची चौकशी करण्यात आली. त्यापैकी ७३८ सराईत गुन्हेगार राहत्या पत्यावर वास्तव्यास असल्याचे आढळून आले. सराईतांकडून कोयते, तलवार, अमली पदार्थ, गावठी दारू असा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शहरातील हाॅटेल, लाॅजची तपासणी करण्यात आली.

गणेशोत्सवाच्या काळात शहरातील कायदा-सुव्यवस्था आणि संभाव्य घातपाती कारवायांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शहरातील संवेदनशील ठिकाणी गस्त वाढविली आहे. उत्सव शांततेत पार पडावा म्हणून पोलिसांकडून बंदोबस्ताची आखणी करण्यात आली आहे. शहरातील सराईत गुंडांची चौकशी सुरू करण्यात आली. कायदा-सुव्यवस्थेला बाधा पोहोचविणाऱ्या गुंडांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यास सुरुवात करण्यात आली आहे.

हेही वाचा : पुणे : चांदणी चौक उड्डाणपुलाजवळील सेवा वाहिन्या काढण्याचे आवाहन

बेकायदा शस्त्र बाळगल्या प्रकरणी पोलिसांनी ४२ जणांना अटक करुन त्यांच्याकडून ३५ कोयते, तलवार, पालघन असा शस्त्रसाठा जप्त करण्यात आला. कोंढवा, हडपसर परिसरातील दाखल गुन्ह्यात पसार असलेले आरोपी तरबेज परवेज शेख (वय २२, रा. सय्यदनगर, हडपसर), पंकज जगदीशप्रसाद वर्मा (वय २५, रा. शिवनेरीनगर, कोंढवा), आकाश दीपक काटम (वय २१, रा. काळेपडळ, हडपसर) यांना अटक करण्यात आली. शहरातील १७२ सराईतांच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली.

हेही वाचा : पुणे : दत्तवाडीत पादचाऱ्याला लुटणारे गजाआड

येरवडा भागात रास्त दरातील शासकीय धान्याचा काळ्या बाजारात विक्री केल्या प्रकरणी खंडणी विरोधी पथकाने कारवाई केली. या कारवाईत टेम्पो तसेच शासकीय योजनेतील धान्य असा १७ लाख ४१ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला तसेच अमली पदार्थ विरोधी पथकाने येरवडा भागात कारवाई करुन गांजा जप्त करण्यात आला तसेच कोंढवा भागात कारवाई करुन गांजा विकणाऱ्या एकास अटक केली. गावठी दारू विक्री प्रकरणी कारवाई करुन ३०९ लिटर गावठी दारू जप्त करण्यात आली.

हेही वाचा : पुणे : बनावट दस्तऐवजाद्वारे व्यावसायिकाच्या बंगल्याची विक्री ; दलालासह सहा जणांच्या विरोधात गुन्हा

शहरातील हाॅटेल, लाॅज तसेच संशयित वाहनांची तपासणी करण्यात आली. पोलीस आयुक्त अमिताभ गुप्ता, सहपोलीस आयुक्त संदीप कर्णिक, अतिरिक्त आयुक्त रामनाथ पोकळे, राजेंद्र डहाळे, नामदेव चव्हाण, पोलीस उपायुक्त श्रीनिवास घाडगे, प्रियंका नारनवरे, सागर पाटील, पौर्णिमा गायकवाड, रोहिदास पवार, नम्रता पाटील, राहुल श्रीरामे यांच्या मार्गदर्शनाखाली विविध पोलीस ठाण्यातील पथके तसेच गुन्हे शाखेची पथके कारवाईत सहभागी झाली होती.