एस. एम. चोक्सी शाळेबाबत पालकांनी केलेल्या तक्रारीमध्ये तथ्य आढळल्याचा अहवाल विभागीय शिक्षण उपसंचालक रामचंद्र जाधव यांनी शासनाला दिला आहे. शाळेच्या पाहणीमध्ये प्रवेश, मान्यता, अल्पसंख्याक दर्जा, शिक्षकांची पात्रता अशा विविध बाबींमध्ये अनियमितता आढळल्याचे जाधव यांनी सांगितले.
गुजराथी केळवणी हितवर्धिनी मंडळ या संस्थेची एस. एम. चोक्सी प्रशाला आहे. या शाळेला भाषिक अल्पसंख्याक शाळेचा दर्जा असून ही गुजराथी शाळा आहे. या शाळेत गैरप्रकार होत असल्याची तक्रार कमलेश शहा यांनी केली होती. त्याची दखल घेऊन शाळेची चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान शाळेत अनेक अनियमितता असल्याचे समोर आले आहे. नियमानुसार शाळेने पन्नास टक्के अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना प्रवेश देणे अपेक्षित आहे. मात्र, प्रत्यक्षात शाळेत ३० टक्केच प्रवेश अल्पसंख्याक विद्यार्थ्यांना देण्यात आले आहेत. शाळेच्या अल्पसंख्याक दर्जाला राज्य शासनाची मान्यता आहे. मात्र, राष्ट्रीय अल्पसंख्याक आयोगाचे प्रमाणपत्र शाळा दाखवू शकली नाही. त्याचप्रमाणे शाळेतील पालक-शिक्षक संघ हा नियमानुसार स्थापन करण्यात आलेला नाही. शाळेने गेली तीन वर्षे नियमबाह्य़ पद्धतीने शुल्कवाढ केली आहे, असे या अहवालात नमूद करण्यात आले आहे.
चौकशीला सहकार्य न केल्याबद्दल मुख्याध्यापकांना कारणे दाखवा नोटीस देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे पालक-शिक्षक संघ बरखास्त करून पालकांकडून घेतलेले वाढीव शुल्क परत करण्याचे आदेशही शाळेला देण्यात आले आहेत. याबाबत शाळा प्रशासनाशी संपर्क होऊ शकला नाही.