पिंपरी : ‘हिंजवडीतील रस्त्याची कामे झालेली नसून, रस्त्यावर खड्डे असून अतिक्रमण कारवाईनंतरचा राडारोडाही रस्त्यावरच आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याकडे लक्ष द्यावे. अन्यथा, गणेशोत्सवानंतर आंदोलन केले जाईल,’ असा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी सोमवारी दिला.

हिंजवडीत १२ ऑगस्ट रोजी दुचाकीवर बसलेल्या ११ वर्षीय प्रत्युषा बोराटे या मुलीचा सिमेंट मिक्सरच्या धडकेत मृत्यू झाला. याप्रकरणी मिक्सर चालक आणि मालकाला अटक करण्यात आली आहे. बोराटे कुटुंबीयांची सुळे यांनी सोमवारी भेट घेतली. त्या वेळी त्या बोलत होत्या.

सुळे म्हणाल्या, ‘हिंजवडी परिसरात अवजड वाहने, मिक्सरच्या वाहतुकीवर निर्बंध आणले असून, वेळ निश्चित केली आहे. परंतु, या वेळेचे पालन केले जात नाही. त्यामुळे अपघात होत आहेत. यावर मुख्यमंत्र्यांनी ठोस कारवाई करावी. हिंजवडीतील रस्त्याची परिस्थिती अतिशय बिकट आहे. वीजपुरवठा सुरळीत होत नाही. सुरक्षितता नाही. हिंजवडीतील समस्या सोडविण्यासाठी मुख्यमंत्र्यांनी स्वत: लक्ष घालावे. यातून मार्ग काढावा. मार्ग काढला नाही, तर गणेशोत्सवानंतर आंदोलन केले जाईल.’

‘हिंजवडीतील रस्त्याची कोणतीही कामे झाली नाहीत. रस्त्यावर खड्डे असून, अतिक्रमण कारवाईनंतर राडारोडा रस्त्यावरच आहे. ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी हिंजवडीला माहिती तंत्रज्ञाननगरी म्हणून देशपातळीवर ओळख मिळवून दिली. लाखो लोक दररोज येथे काम करतात. कोट्यवधी रुपयांची उलाढाल होते. परदेशात मालाची निर्यात केली जाते. हिंजवडीतील दुरवस्थेला सरकारचा नाकर्तेपणा कारणीभूत आहे. हिंजवडीतील परिस्थितीमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर राजीव गांधी इन्फोटेक पार्कचे नाव खराब होत आहे. हे राज्य सरकारचे अपयश आहे. येथील समस्या सरकारने प्राधान्याने सोडवाव्यात.