पुणे : दिवाळीनंतर भासणारी रक्ताची चणचण दूर करण्यासाठी पुणेकरांनी जवळच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करण्याचे आवाहन जनकल्याण रक्तपेढीने केले आहे.दरवर्षीप्रमाणे दिवाळीनंतर रक्ताची मोठी चणचण भासत आहे. थॅलसेमिया, कर्करोग आणि अन्य आजारातील रुग्णांना रक्ताचा सुलभ पुरवठा होण्यासाठी अडचण येत आहे. अपघात, बाळंतपण अशा तातडीच्या आवश्यकतेसाठीही रक्त उपलब्ध करणे अवघड झाले आहे. त्यामुळे पुणेकरांनी जवळच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करणे आवश्यक आहे. अन्यथा रुग्णांना मोठ्या समस्येला सामोरे जावे लागण्याची शक्यता आहे, असे जनकल्याण रक्तपेढीचे कार्यकारी संचालक डाॅ. अतुल कुलकर्णी यांनी सांगितले.
आपल्या प्राथमिकतेने केलेल्या रक्तदानामुळे रुग्णाला वेळेत रक्त उपलब्ध होईल. दिवाळीनंतर आपला आणि रुग्णांचा प्रवास प्रकाशमान व्हावा यासाठी पुणेकरांनी आपल्या नातेवाईक आणि मित्रपरिवारासह जवळच्या रक्तपेढीमध्ये जाऊन मतदान करावे, असे आवाहन डाॅ. कुलकर्णी यांनी केले.
जनकल्याण रक्तपेढीकडे गेल्या महिन्यापर्यंत दरमहा दोन हजार रक्त पिशव्यांचे संकलन होत होते. गेल्या महिन्यापर्यंत २९३ शिबिरे आणि रक्तपेढी संकलन मिळून १९ हजार ६४९ रक्त पिशव्यांचे संकलन झाले. त्यापैकी ऑक्टोबर महिन्यात शनिवारपर्यंत मिळून १३०० रक्त पिशव्यांचे संकलन झाले. जनकल्याण रक्तपेढीला दररोज ८० ते ९० रक्त पिशव्यांची आवश्यकता असते. ही तूट भरून काढण्यासाठी पुणेकरांनी जवळच्या रक्तपेढीमध्ये जाऊन रक्तदान करावे. डॉ अतुल कुलकर्णी, कार्यकारी संचालक, जनकल्याण रक्तपेढी
