scorecardresearch

पुणे : प्राप्तिकरासाठी नव्या प्रणालीचा नागरिकांना फायदा, जयंत सिन्हा यांचा दावा

प्रत्यक्ष कराचे सुलभीकरण करण्याची सर्वसामान्यांची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्राप्तिकर आकारणीसाठी नवी कर प्रणाली आणली आहे.

jayant sinha
जयंत सिन्हा (फोटो सौजन्य : फायनान्शियल एक्सप्रेस)

पुणे : प्रत्यक्ष कराचे सुलभीकरण करण्याची सर्वसामान्यांची मागणी पूर्ण करण्याच्या उद्देशाने प्राप्तिकर आकारणीसाठी नवी कर प्रणाली आणली आहे. यामध्ये बचतीवरील उत्पन्नावर वजावट मिळणार नसली, तरी कराचे दर कमी असल्याने नागरिकांना मोठा फायदा होईल, असा दावा माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री आणि संसदेच्या वित्त विभागाच्या स्थायी समितीचे अध्यक्ष जयंत सिन्हा यांनी शनिवारी केला. यंदाचा अर्थसंकल्प सर्व घटकांसाठी संतुलित आणि भारताला प्रगतीपथावर नेणारा आहे,’ असेही त्यांनी सांगितले.

‘बीजेपी इन्फ्रास्ट्रक्चर’ आणि ‘बीजेपी बिझनेस सेल पुणे’ यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमात सिन्हा यांनी केंद्रीय अर्थसंकल्पाची वैशिष्ट्ये उलगडली. भाजप शहर सरचिटणीस राजेश पांडे, मंदार देवगावकर, अमृता देवगावकर आणि दीपक नागपुरे यावेळी उपस्थित होते. करोना संकटाची दोन वर्षे, रशिया-युक्रेन युद्ध आणि चीनमधील टाळेबंदी, अशा जागतिक परिप्रेक्ष्यातून या अर्थसंकल्पाकडे पाहिले पाहिजे, असे सांगून सिन्हा म्हणाले, अमेरिका, चीन आणि युरोपीय देशांची अर्थव्यवस्था मंदीच्या सावटाखाली असताना भारत हाच एकमेव चमकता तारा आहे.

हेही वाचा >>> सिंहगड रोड परिसरात दहशत माजविणाऱ्या कोयता गँगमधील एकाचा जामीन अर्ज फेटाळला

अमृत काळातील हा अर्थसंकल्प देशाला स्थैर्य देणारा आहे. शेती आणि सहकार क्षेत्रावर भर, वंचित-शोषित-आदिवासी घटकांचा विकास, युवकांसाठी कौशल्य केंद्रे, सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योगांसाठी भरीव तरतूद, हरित विकास, वित्तीय क्षेत्रासाठी महत्त्वपूर्ण निर्णय, रेल्वे व महामार्गासाठी भरीव तरतूद, ही अर्थसंकल्पाची सात बलस्थाने आहेत. विज्ञान, शिक्षण, संशोधन आणि आरोग्य या क्षेत्रांसाठी मोठ्या प्रमाणावर तरतूद करण्यात आली आहे. आरोग्य क्षेत्रातील संशोधन आणि दुर्दैवाने करोनासारखी एखादी साथ आली तर लस निर्मिती करण्यासाठी पुण्यातील राष्ट्रीय विषाणू संस्थेला (एनआयव्ही) भरीव निधी देण्यात आला आहे.

हेही वाचा >>> कसबापेठ, चिंचवड पोटनिवडणुकीसाठी भाजपाकडून उमेदवारांची घोषणा! लक्ष्मण जगताप यांच्या पत्नीला संधी

सकल राष्ट्रीय उत्पन्न (जीडीपी) सात टक्के आहे. भविष्यातील मंदीचे संकेत पाहता, सहा महिन्यात तो साडेसहा टक्क्यांवर येईल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. मात्र, भारतीय अर्थव्यवस्था वेगाने वाढत आहे,असे सिन्हा यांनी सांगितले. मेट्रो, उड्डाणपूल, रस्ते आणि नदीसुधार योजनेच्या माध्यमातून पुणे झपाट्याने विकसित होत असून, लाखो युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होत आहेत, असे समाधान त्यांनी व्यक्त केले. 

हवाई चप्पल परिधान करणाऱ्या व्यक्तीला विमानात बसता यावे, हे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे स्वप्न सत्यात उतरले आहे. मी नागरी उड्डाण मंत्री असताना देशभरात ७४ विमानतळे होती. ती संख्या आता १४० विमानतळांपर्यंत पोहोचली आहे हे प्रगतीचे द्योतक आहे.

– जयंत सिन्हा, माजी केंद्रीय अर्थ राज्यमंत्री

मराठीतील सर्व पुणे ( Pune ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

First published on: 04-02-2023 at 14:17 IST
ताज्या बातम्या