बीडचा किरण बापकर राखीव प्रवर्गात देशात प्रथम
आयआयटी आणि इतर राष्ट्रीय पातळीवरील अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी घेण्यात आलेल्या ‘जेईई अॅडव्हान्स’ परीक्षेचा निकाल रविवारी जाहीर झाला असून चंदिगड येथील सर्वेश मेहतानी हा देशात पहिला आला आहे, तर पुण्यातील अक्षत चुग हा दुसऱ्या स्थानावर आहे. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून बीड येथील किरण बापकर हा पहिला आला आहे.
आयआयटी आणि इतर काही राष्ट्रीय अभियांत्रिकी शिक्षण संस्थांमधील प्रवेशासाठी जेईई अॅडव्हान्स घेण्यात येते. या परीक्षेत देशातून पहिल्या आलेल्या सर्वेश मेहतानी याला ३६६ पैकी ३३९ गुण आहेत. जेईई मेन्समध्ये त्याला ५५ वे स्थान मिळाले होते. दुसरा आलेला अक्षत चुग हा पुण्यातील उंड्री भागातील दिल्ली पब्लिक स्कूलचा विद्यार्थी आहे. त्याला ३३५ गुण मिळाले आहेत. मेन्समध्ये तो सातव्या स्थानावर होता, तर बारावीला त्याला ९८ टक्के गुण मिळाले आहेत. देशात दिल्ली येथील अनन्या अगरवाल तिसरी आली आहे. तिला ३३१ गुण आहेत. इतर मागासवर्गीय विद्यार्थ्यांमधून मूळचा बीड येथील किरण बापकर हा पहिला आला आहे. त्याला २०७ गुण आहेत. देशभरातील २३ आयआयटीमधील साधारण ११ हजार जागांवरील प्रवेश या निकालाच्या माध्यमातून होणार आहेत.
देशभरात २१ मे रोजी ही परीक्षा झाली होती. यंदा जेईई मेन्समधून पात्र ठरलेले साधारण १ लाख ७१ हजार विद्यार्थी अॅडव्हान्स परीक्षेला बसले होते. त्यापैकी ३० हजार विद्यार्थ्यांना गुणवत्ता यादीत स्थान (रँक) मिळाले आहे. यंदा गुणवत्तेचा विचार करता निकालात वाढ झाल्याचे निरीक्षण तज्ज्ञांकडून नोंदवण्यात आले आहे. यापूर्वी २०१५ मध्ये देशात २ हजारावी रँक असलेल्या विद्यार्थ्यांना ४३.५५ टक्के मिळाले होते, २०१६ मध्ये ४९ टक्के होते. यंदा २ हजार रॅँक असलेल्या विद्यार्थ्यांना ६८ टक्के गुण मिळाले आहेत.
३६६ गुणांच्या या परीक्षेत खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी १२८ गुण, इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (ओबीसी) ११५ गुण, मागासवर्गीय जाती आणि जमातींसाठी (एससी आणि एसटी) ६४ गुण असे पात्रता निकष राहणार आहेत.
शाळेमध्ये होणाऱ्या नियमित तासिका आणि एका खासगी संस्थेतून जेईई परीक्षेचे मार्गदर्शन घेतले. याशिवाय घरी रोज नियमित साधारण तीन तास अभ्यास केला. – अक्षत चुग, देशात दुसरा
आम्हाला एका खासगी संस्थेतील शिक्षक जेईईसाठी मार्गदर्शन करायला यायचे. मात्र अकरावीत असताना कावीळ झाल्यामुळे मी पुन्हा खूप दिवस बीडच्या घरी राहात होतो. मात्र त्यानंतर बुडालेला सर्व अभ्यासक्रम पूर्ण केला. –किरण बापकर, इतर मागासवर्गीयांत पहिला