पुणे : तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार करणाऱ्या सावत्र वडिलांना विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी जन्मठेप आणि २५ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. आरोपीने मुलीवर अत्याचार करताना क्राैर्याची परिसीमा गाठली. अत्याचारामुळे मुलीवर शस्त्रक्रिया करावी लागल्याचे नमूद करत विशेष न्यायाधीश कविता शिरभाते यांनी आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
याबाबत पीडित मुलीच्या आईने वारजे माळवाडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली होती. ५ फेब्रुवारी २०१८ रोजी ही घटना घडली होती. गुन्हा घडण्यापूर्वी दोन महिने आधी फिर्यादी महिलेने आरोपीशी विवाह केला होता आरोपीला पहिल्या पत्नीपासून दोन मुले आहेत. घटनेच्या दिवशी रात्री नऊ वाजता आरोपीने पत्नीशी भांडण करून तिच्या तीन वर्षांच्या मुलीला जबरदस्तीने घराबाहेर नेले. त्यानंतर मध्यरात्री साडेबाराच्या सुमारास आरोपी मुलीला घेऊन घरी आला. त्यावेळी मुलगी रक्ताने माखली हाेती. या घटनेनंतर घाबरलेल्या आईने वारजे पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्यानंतर आरोपीला अटक करण्यात आली. तत्कालीन पोलिस उपनिरीक्षक मीरा त्र्यंबके यांनी तपास करुन आरोपीविरुद्ध आरोपपत्र दाखल केले.
या खटल्यात सरकार पक्षाकडू विशेष सरकारी वकील नितीन कोंघे यांनी बाजू मांडली. फिर्यादी महिलेच्या वतीने ॲड. गौरव जाचक यांनी बाजू मांडली. ‘मुस्कान’ या स्वयंसेवी संस्थेने फिर्याद महिलेला सहायक केले. या खटल्यात सरकार पक्षाकडून नऊ साक्षीदारांची साक्ष नोंदविण्यात आली. .फिर्यादी महिला आणि चार वैद्यकीय अधिकाऱ्यांची साक्ष या खटल्यात महत्वाची ठरली.
आरोपीने तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार केले. या घटनेत ती गंभीर जखमी झाली. गंभीर जखमांमुळे तिच्यावर तीन महिने रुग्णालयात उपचार सुरू होते. आरोपीने केलेला गुन्हा घृणास्पद असून, त्याला कठोर शिक्षा सुनावण्यात यावी, अशी विनंती सरकारी वकील नितीन कोंघे आणि फिर्यादी महिलेचे वकील गौरव जाचक यांनी युक्तिवादात केली. आरोपीने अपघातात मुलगी जखमी झाल्याचा बनाव केला. मात्र, आरोपीने याबाबत न्यायालयात पुरेसे पुरावे सादर केले नाहीत, असे न्यायालयाने निकालपत्रात नमूद करुन आरोपीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली.