पुणे : अवैध गावठी हातभट्टी दारू तयार करून विक्रीच्या ठिकाणी काळेपडळ पोलिसांनी छापा टाकून अड्डा उद्ध्वस्त केला. छाप्यात तब्बल ५३ कॅनसह एका बॅरलमध्ये भरून ठेवलेली दोन हजार ६५ लिटर गावठी हातभट्टी आणि ४ लाख १३ हजारांचा ऐवज जप्त करण्यात पोलिसांना यश आले आहे. नवीन दिलीप बिनावत (वय ५४, रा. सातवनगर, हांडेवाडी रस्ता, हडपसर) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
अवैध धंदे करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाईचे आदेश पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी दिले आहेत. त्या पार्श्वभूमीवर काळेपडळ ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली तपास पथकाकडून ठिकठिकाणी शोधमोहीम राबविण्यात आली. ११ जून रोजी तपास पथकाचे सहायक पोलीस निरीक्षक अमित शेटे, दाऊद सय्यद, अतुल पंधरकर, खोकले, महादेव शिंदे हद्दीत गस्त घालत होते. सातवनगर येथे बांधकाम सुरू असलेल्या इमारतीजवळ एकजण दारूसाठा करून विक्री करीत असल्याची माहिती पथकाला मिळाली.
तपास पथकाने सापळा रचून हातभट्टी अड्ड्यावर छापा टाकून कारवाई केली. आरोपी नवीन दिलीप बिनावत याला ताब्यात घेतले. त्या ठिकाणाहून पोलिसांनी तयार हातभट्टीच्या दारूने भरलेले ५३ कॅनसह बॅरेलमध्ये भरून ठेवलेली २ हजार ६५ लिटर हातभट्टी जप्त केली. आरोपीविरूद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम सन १९४९ कलम ६५ (ई) अन्वये गुन्हा दाखल केला. ही कामगिरी पोलीस उपायुक्त डॉ. राजकुमार शिंदे, सहायक आयुक्त धन्यकुमार गोडसे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक मानसिंग पाटील, पोलीस निरीक्षक अमर काळंगे, अमोल फडतरे, शाहीद शेख, नितीन ढोले, प्रवीण कांबळे, परशुराम पिसे यांनी केली.