पाकिस्तानशी १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धादरम्यान देशसेवा करणाऱ्या जवानाच्या कुटुंबीयांवर बांगलादेशी असल्याचा आरोप करण्यात आल्याची बाब पुण्यात घडली आहे. पुण्याच्या चंदननगर पसिरात २६ जुलै रोजी मध्यरात्री हा प्रकार घडल्याचं आता उघड झालं असून यामुळे संबंधित कुटुंबाला मोठा मनस्ताप झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी आधी या कुटुंबालाच पोलीस स्थानकात नेल्याचीही बाब इंडियन एक्स्प्रेसनं दिलेल्या सविस्तर वृत्तात नमूद करण्यात आली आहे. अखेर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला असून गोंधळ घालणाऱ्यांवर कारवाईचं आश्वासन पोलिसांकडून देण्यात आलं आहे.
नेमका प्रकार काय?
चंदननगरमध्ये शमशाद शेख व त्यांचं कुटुंब वास्तव्यास आहे. त्यांचे काका हकिमुद्दीन शेख हे लष्करातून निवृत्त झाले असून कारगिल युद्धादरम्यान त्यांनी देशाच्या सीमेवर आपलं कर्तव्य बजावलं होतं. सध्या ते उत्तर प्रदेशमध्ये वास्तव्यास आहेत. याशिवाय त्यांच्या कुटुंबातील इतरही काही सदस्यांनी भारतीय लष्करात देशसेवा केली आहे. एकीकडे कुटुंबाच्या लष्करी पार्श्वभूमीमुळे आसपासच्या नागरिकांकडून आदरानं पाहिलं जात असताना दुसरीकडे २६ जुलैच्या मध्यरात्री शमशाद शेख यांना भयंकर अनुभव आला. ते बांगलादेशी असल्याचा आरोप करत तब्बल ६०-७० लोकांच्या जमावाने त्यांच्या घरात घुसून गोंधळ घातल्याचा दावा त्यांनी केला आहे. या प्रकारामुळे शेख कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
शमशाद शेख यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलीस तिथे सामान्य पोशाखात उपस्थित होते, मात्र त्यांनी हा प्रकार थांबवला नाही. मध्यरात्री पोलीस कुटुंबीयांना पोलीस स्थानकात घेऊन गेल्याचा दावाही शमशाद शेख यांनी केला आहे. यासंदर्भात पोलिसांना विचारणा केली असता बांगलादेशी वास्तव्य करत असल्याच्या माहितीच्या आधारावर पोलीस तिथे तपास करत होते, अशी माहिती देण्यात आली आहे. यावेळी शेख यांच्या घरात मोठा जमाव घुसल्याच्या आरोपांचीही चौकशी केली जात असल्याचं पोलिसांनी इंडियन एक्स्प्रेसला सांगितलं.
२६ जुलैला मध्यरात्री काय घडलं?
शमशाद शेख म्हणाले, “रात्री ११.३० ते १२ च्या सुमारास आमच्या घराच्या दरवाज्यावर काही लोक लाथा मारू लागले. दरवाजा उघडताच ते घरात शिरले आणि आमची ओळखपत्रे मागू लागले. ७ ते १० लोकांच्या गटाने हा जमाव घरात शिरला. त्यातले काही आमच्या बेडरूममध्येही गेले व त्यांनी घरातील महिला व मुलांना झोपेतून उठवलं. आम्ही त्यांना आमचं आधार कार्ड, पॅन कार्ड आणि मतदान ओळखपत्रही दाखवलं. पण हे सगळं खोटं असल्याचंच ते म्हणत राहिले”.
“त्यांनी आम्हाला पोलीस व्हॅनमध्ये बसवलं आणि पोलीस स्थानकात नेलं. तिथे पोलीस निरीक्षक सीमा ढाकणे यांनी आम्हाला दुसऱ्या दिवशी सकाळी पुन्हा एकदा पोलीस स्थानकात यायला सांगितलं, नाहीतर तुम्हाला बांगलादेशी जाहीर केलं जाईल, असं त्या म्हणाल्या”, असा दावाही शेख यांनी कला. पोलीस निरीक्षक ढाकणे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही.
कुटुंबाची लष्करी सेवेची पार्श्वभूमी
दरम्यान, त्याच घरात राहणारे शमशाद शेख यांचे काका इर्शाद अहमद यांनी शेख कुटुंबाच्या लष्करी पार्श्वभूमीबाबत माहिती दिली. “आमच्या कुटुंबाला भारतीय लष्करात सेवा दिल्याचा १३० वर्षांचा इतिहास आहे. आमचे पणजोबा लष्करात हवालदार म्हणून निवृत्त झाले. आमचे आजोबा लष्करात सुभेदार होते. त्यांचे भाऊ जमशेद खान हे मध्य प्रदेशचे पोलीस महासंचालक होते. माझे दोन काका लष्करात सुभेदार मेजर होते. त्यापैकी नजिमुल्लाह खान १९६२ साली लष्करात दाखल झाले. ते १९६५ व १९७१ च्या युद्धातही होते. मोहम्मद सलीम हे १९६८ साली लष्करात दाखल झाले. तेही १९७१ च्या युद्धात होते. माझा भाऊ हकिमुद्दीन पुण्यात १९९२ साली बॉम्बे सॅपर्समध्ये दाखल झाला. प्रशिक्षणानंतर त्याची देशभर बदली होत होती. तो कारगिल युद्धात लढला. २००० साली तो निवृत्त झाला”, असं इर्शाद अहमद म्हणाले.
यावेळी कुटुंबीयांनी हकिमुद्दीन व सलीम यांची लष्करातील ओळखपत्रेही दाखवली. शिवाय, निवृत्ती वेतनाची कागदपत्रेही दाखवली.
पोलिसांचं म्हणणं काय?
दरम्यान, डीसीपी सोमय मुंडे यांनी याबाबत माहिती देताना सांगितलं की, “आम्हाला माहिती मिळाली की तिथे काही बांगलादेशी आहेत, त्यामुळे आम्ही तिथे गेलो. काहींची कागदपत्रे तिथेच तपासली गेली, तर काहींना पोलीस स्थानकात आणलं गेलं. रात्री खूप उशीर झाला होता म्हणून त्यांना तेव्हा सोडलं आणि दुसऱ्या दिवशी परत यायला सांगितलं. कधीतरी अशा कारवायांमध्ये संशयित पळून जातात, त्यामुळे या कारवाया रात्रीच केल्या जातात. आम्ही यासंदर्भात अधिक तपास करत आहोत”. दरम्यान, सदर कुटुंबाकडून बजरंग दलाने हा गोंधळ घातल्याचा आरोप करण्यात आला असून त्यासंदर्भात तपास चालू आहे, अशीही माहिती मुंडे यांनी दिली.
‘माजी सैंनिकाच्या घरासमोर घोषणाबाजी करणे, तसेच गोंधळ घालण्याची कृती खेदजनक आहे. अशा प्रकारचे कृत्य करणाऱ्यांविरुद्ध, तसेच समाजात विद्वेष पसरविणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्यात येईल व या प्रकरणी चाैकशी करून संबंधितांविरुद्ध कारवाई करण्यात येईल,’ असे आश्वासन पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिले.
जमावाच्या काही कृती आक्षेपार्ह – पोलीस आयुक्त
जेव्हा अमितेश कुमार यांना डीसीपी सोमय मुंडे यांच्या विधानाबाबत विचारणा केली, तेव्हा त्यांनी त्यावर प्रतिक्रिया दिली. “मी तुम्हाला घटनाक्रम सांगेन. त्या भागात मोठी गर्दी होती. त्यांना शंका होती कि तिथे बांगलादेशी राहतात. अशाच प्रकारची माहिती पोलिसांनाही मिळाली होती. पण तिथे गर्दी आधी जमली की पोलीस आधी पोहोचले हे तपासावं लागेल. पण बहुधा या दोन्ही गोष्टी एकाच वेळी घडल्या. तिथे जमावाने केलेल्या काही कृती या प्रथमदर्शनी आक्षेपार्ह होत्या”, असं अमितेश कुमार म्हणाले.
इर्शाद अहमद यांचा त्रागा
दरम्यान, अशा प्रकारे वागणूक मिळाल्यामुळे इर्शाद अहमद यांनी संताप व्यक्त केला आहे. “आमचं कुटुंब देशाच्या सीमांवर रक्षण करत आलं आहे. आमच्या कुटुंबानं शत्रूशी दोन हात केले आहेत. माझे काका ७१ च्या युद्धात जखमी झाले होते. आमच्या कुटुंबानं देशासाठी एवढा त्याग केलेला असताना आम्हाला आमची ओळख विचारली जाणं हे वेदनादायी आहे. पुण्यासारख्या शांत शहरात आम्ही ६४ वर्षांपासून राहात आहोत, पण असं कधी ऐकलं नव्हतं”, असं ते म्हणाले.
“ते ५ वर्षांच्या लहान मुलांनाही मध्यरात्री उठवत होते. ते मूल धड उभंही राहू शकत नव्हतं. त्यामुळे ते खाली पडलं. पोलिसांनी मध्यरात्री २ वाजता आम्हाला पोलीस स्थानकात का बोलावलं? पोलिसांनी आमच्या घरी यायची ही काय वेळ आहे का? आम्ही काय सराईत गुन्हेगार आहोत की माफिया? की मग आमच्यावर दहशतवादी असल्याचा शिक्का आहे? किंवा मोक्का वा टाडासारखे गुन्हे आमच्यावर दाखल आहेत का?” असे सवाल इर्शाद अहमद यांनी उपस्थित केले आहेत.