पिंपरी : श्री क्षेत्र आळंदी येथे होणाऱ्या कार्तिकी यात्रेनिमित्त आणि संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या ७५० व्या संजीवन समाधी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर पिंपरी-चिंचवड पोलिसांनी वाहतुकीत बदल केला आहे. उद्या, बुधवारपासून (दि.१२) २० नोव्हेंबरपर्यंत हा बदल असणार आहे.

आळंदीत कार्तिकी यात्रेनिमित्त बुधवारपासून विविध धार्मिक कार्यक्रमास सुरुवात होणार आहे. १५ नोव्हेंबर रोजी कार्तिकी एकादशी असून १७ नोव्हेंबर रोजी संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांचा ७५० वा संजीवन समाधी सोहळा आहे. यानिमित्त लाखो भाविकांची गर्दी होणार आहे. आळंदी आणि देहू परिसरात १० ते १५ लाख भाविक दर्शनासाठी येण्याचा अंदाज आहे. भाविक मोठ्या संख्येने आळंदीहून देहू येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज मंदिर, गाथा मंदिर व भंडारा डोंगराकडे दर्शनासाठी जातात. आळंदी, देहूगाव येथे वाहतूक कोंडी होण्याची शक्यता ध्यानात घेऊन वाहतुकीत बदल करण्यात आला आहे. अत्यावश्यक सेवेतील, दिंडीतील वाहने वगळून आळंदी शहरात सर्व प्रकारच्या वाहनांना प्रवेशबंदी करण्यात आली आहे. त्यात पुणे-आळंदी रस्ता, मोशी-आळंदी, चिंबळी-आळंदी, चाकण-आळंदी, वडगाव घेणंद मार्गे-आळंदी आणि मरकळ-आळंदी हे मुख्य रस्ते बंद राहणार आहेत.

अवजड वाहनांना प्रवेश बंद

मोशी चौक, भारतमाता चौक, चिंबळीफाटा, चाकण, आळंदी फाटा, माजगाव फाटा चाकण, भोसे फाटा, चाकण-वडगाव घेणंद मार्ग, मरकळमार्ग, पुणे दिघी-मॅगझीन चौक, देहूगाव कमान, कॅनबे चौक, तळेगाव-चाकण रस्त्यावरील देहूफाटा येथून आळंदी, देहूगावकडे जाणाऱ्या सर्व अवजड वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली आहे. या मार्गावरील अवजड वाहनांनी जयगणेश साम्राज्य, अलंकापुरम चौक, चोविसावाडी, विश्रांतीवाडी, भोसरी, मोशी-चाकण, भोसरी चौक, कोयाळी कमान, धानोरी फाटा, भोसरी मार्गे, चऱ्होली फाटा, भक्ती-शक्ती चौक या पर्यायी मार्गाचा वापर करण्याचे आवाहन पोलिसांनी केले आहे.

वाहनतळाची व्यवस्था

तळेकर पाटील चौकाजवळ (दक्षिण व उत्तर बाजू), आदित्य इंटरनॅशनल स्कूल, डुडुळगाव, ज्ञानविलास महाविद्यालय परिसर, मुंगसे वाहनतळ बोपदेव चौक, चाकण रस्त्यावरील इंद्रायणी रुग्णालयासमोरील जागा, विश्रांतवाडी-वडगाव रोड, मुक्ताई मंगल कार्यालयाजवळ, आळंदी नगर परिषद शौचालयाजवळील वाहनतळामध्ये वाहने उभी करण्याची व्यवस्था करण्यात आली आहे.

बस स्थानके

भाविकांसाठी आळंदी येथून सर्व ठिकाणी जाण्यासाठीच्या एसटी, पीएमपीएमल बस योगिराज चौकातून सुटणार आहेत. देहूगावकडे जाणाऱ्या बस डुडुळगाव येथील जकातनाका येथे थांबतील. पुण्याकडे जाणाऱ्या बस चऱ्होली फाटा, वाघोली, शिक्रापूरकडे जाणाऱ्या बस धानोरे फाटा चौक, चाकणकडे जाणाऱ्या बस इंद्रायणी रुग्णालय आणि अहिल्यानगरकडे जाणाऱ्या बस विश्रांतवाडी फाटा चौकात थांबतील, असे पोलिसांनी सांगितले.