पुणे : भारतीय जनता पक्षाला (भाजप) पूरक असलेल्या मध्यवर्ती पेठांचा समावेश असलेल्या कसबा विधानसभा मतदारसंघात पूर्वीपासूनच भाजपचे वर्चस्व राहिलेले आहे. आगामी महापालिका निवडणुकीसाठी प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप प्रभाग रचनेमध्ये या मतदारसंघातील प्रभागांमध्ये फारसे बदल झालेले नाहीत.
या मतदारसंघात पाच प्रभागांचा समावेश होतो. यामध्ये काही भाग पर्वती मतदारसंघात जोडण्यात आला आहे. काँग्रेसचे माजी आमदार आणि शिवसेना (शिंदे) पक्षाचे महानगर प्रमुख रवींद्र धंगेकर यांचे कार्यक्षेत्र असलेला हा परिसर असल्याने महायुती झाल्यास जागेसाठी, तर स्वबळावर लढल्यास भाजप आणि शिवसेना (शिंदे) या पक्षांमध्ये जुंपण्याची शक्यता आहे.
मध्यवर्ती पेठांचा भाग असलेल्या या प्रभागांमध्ये गेल्या अनेक वर्षांपासून भाजपला मानणारा वर्ग मोठा आहे. या मतदारसंघात येत असलेल्या प्रभागांमध्ये १२ ते १५ टक्के इतकाच बदल करण्यात आला आहे. त्यामुळे जुन्याच उमेदवारांना पुन्हा भाजपकडून संधी मिळणार की तरुण चेहऱ्यांना संधी देत जुन्यांना धक्का देणार, यावर या मतदारसंघातील निवडणूक रंगणार आहे.
महापौर, स्थायी समिती अध्यक्ष, सभागृहनेता अशी अनेक महत्त्वाची पदे कसब्याच्या वाट्याला आतापर्यंत आलेली आहेत. भाजपसाठी पूरक वातावरण असलेला मतदारसंघ अशी ओळख कसब्याची असल्याने भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढविण्यासाठी अनेकांनी तयारी सुरू केली आहे.
या मतदारसंघातील प्रभाग हे कमी लोकसंख्येचे आहेत. त्यामुळे त्याच चेहऱ्यांना निवडणुकीत पुन्हा संधी मिळण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. प्रभागांमध्ये काहीच बदल झालेले नाहीत, त्या ठिकाणी मात्र पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांमध्येच रंगतदार लढत होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे या मतदारसंघात भाजपचेच वर्चस्व राहणार की मतदार नवीन पर्याय शोधणार? हे निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.
प्रभाग क्रमांक २५ मधून गेल्या वेळी निवडणूक लढविलेले हेमंत रासने आता आमदार झाले आहेत, तर महापौर आणि आमदार म्हणून निवडून आलेल्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक येथून निवडून आल्या होत्या. त्यामुळे या प्रभागातून यंदाच्या निवडणुकीत भाजप कोणाला संधी देणार? याबाबत उत्सुकता निर्माण झाली आहे.
प्रभाग क्रमांक २४ कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ या परिसरात काँग्रेसमधून शिवसेना (शिंदे) पक्षात गेलेले माजी आमदार रवींद्र धंगेकर यांची ताकद मोठी आहे. ते स्वत: उभे राहणार की त्यांच्या घरातील अन्य कोणाला संधी देणार, यावर ही निवडणूक चुरशीची ठरणार आहे. माजी सभागृहनेते गणेश बिडकर यांचे कार्यक्षेत्र असलेला हा प्रभाग आहे. निवडणुकीत महायुती न झाल्यास धंगेकर-बिडकर यांच्यात देखील गेल्या निवडणुकीसारखी लढत यंदाच्या वर्षी होण्याची शक्यता आहे.
प्रभाग क्रमांक २३ रविवार पेठ- नाना पेठ या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाची ताकद मोठी आहे. गेल्या निवडणुकीत दोन नगरसेवक येथून निवडून आले होते. तर शिवसेनेच्या तिकिटावर विजयी झालेले विशाल धनवडे यांनी काही महिन्यांपूर्वी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे या प्रभागातून ते देखील इच्छुक राहणार आहेत. महायुती न झाल्यास या पक्षांचे नक्की कोण निवडणुकीत उतरणार यावर येथील विजयाची गणिते अवलंबून आहेत.
कसबा मतदारसंघात पूर्वीपासूनच भाजपचे वर्चस्व राहिले आहे. त्यामुळे याठिकाणी भाजपचेच वर्चस्व राहणार की, मतदार नवीन पर्याय शोधणार हे येत्या महापालिका निवडणुकीतच स्पष्ट होणार आहे.
प्रभाग क्रमांक – प्रभागाचे नाव
२३ रविवार पेठ – नाना पेठ
२४ कमला नेहरू हॉस्पिटल – रास्ता पेठ
२५ शनिवार पेठ – महात्मा फुले मंडई
२६ गुरुवार पेठ – घोरपडे पेठ
२७ नवी पेठ – पर्वती