मागील काही दिवसांपासून जम्मू-काश्मीर येथील पंडितांवर हल्ले होत आहेत. या घटनांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातील गुडलक चौकात शिवसेनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले. काश्मिरी पंडितांना संरक्षण देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील यावेळी शिवसैनिकांकडून करण्यात आली.

PHOTOS : काश्मिरी पंडितांवरील हल्ल्याच्या निषेधार्थ पुण्यात शिवसेनेचे आंदोलन; मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी

शिवसेना पुणे शहरप्रमुख संजय म्हणाले, केंद्रातील सत्तेला आठ वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने भाजपाकडून विविध ठिकाणी कार्यक्रम घेतले जात आहे. पण त्याच दरम्यान जम्मू-काश्मीर येथील पंडितांवर पुन्हा एकदा हल्ले सुरू झाले. या हल्ल्यात आतापर्यंत १३ जणांचा मृत्यू झाला आहे. ही बाब निषेधार्ह असून या घटना रोखण्यात केंद्र सरकार अपयशी ठरले आहे. तेथील नागरिकांना संरक्षण द्यायचे सोडून केंद्र सरकार केवळ वाचळ वीरांना संरक्षण देत बसले आहे, अशा शब्दांत केद्र सरकार त्यांनी निशाणा साधला. तसेच, काश्मिरी पंडितांना संरक्षण देण्यात भाजपा सरकार अपयशी ठरले आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी देखील यावेळी केली.

आंदोलक कार्यकर्त्यांचा महिला पोलिसांसोबत वाद –

शिवसेनेकडून करण्यात आलेल्या गुडलचौकातील आंदोलन ठिकाणी कलाकार कट्टा आहे, तेथे भाजपाच्या एका नगरसेविकेचे नाव असलेल्या बोर्डवर एका आंदोलक कार्यकर्त्यांनी घोषणाचे स्टिकर लावले. हे तेथील महिला पोलीस कर्मचारीने पाहिले व असे करण्यास मज्जाव केला, मात्र संबंधित कार्यकर्ते ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने यावरून वाद निर्माण झाला. अखेर संबधीत कार्यकर्त्यांला पोलिसांनी समज देताच, तेथील सर्व स्टीकर काढून टाकण्यात आले.