राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघाचा (कात्रज) कारभार उत्तम रितीने सुरू आहे. जिल्ह्यातील अन्य सहकारी संस्थांच्या बरोबरीने कात्रज दूध संघ जिल्ह्याच्या विकासात मोलाची भूमिका बजावत आहे. अजित पवार यांच्यासह उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही संघाला मोलाचे मार्गदर्शन मिळत आहे, असे सांगत अध्यक्ष भगवानराव पासलकर यांनी सभेची सुरुवात केली. पण, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि खासदार सुप्रिया सुळे यांचा नामोउल्लेख टाळला.

हेही वाचा >>> पिंपरी-चिंचवडमध्ये अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात गणेश दर्शनावरून स्पर्धा

सर्वसाधारण सभेची सुरुवात अध्यक्ष पासलकर यांच्या भाषणाने झाली. पासलकर यांनी आपल्या भाषणात पाच-सहा वेळा अजित पवारांचे नाव घेतले. अखेरीस एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचेही नाव घेतले. पण, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचा नामोउल्लेख करणे पालसकर यांनी टाळले. कात्रजच्या सभेत राष्ट्रवादीतील दुहीचे प्रतिबिंब स्पष्टपणे उमटलेले दिसून आले.

अध्यक्षांचा बचावाचा पवित्रा

सभासद रामदास डिंबळकर यांनी अजित पवारांच्या नामोउल्लेखाचा धागा पकडत संघाच्या अनागोंदी कारभारावर बोट ठेवले. अजित पवारांच्या नेतृत्वाखाली जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक चांगली चालत आहे. मग, जिल्हा दूध संघ का चांगला चालत नाही. संघाचा नफा अडीच कोटींवरून थेट ५१ लाखांवर कसा आला, असा प्रश्न त्यांनी उपस्थित करताच सभेत गोंधळ उडाला. ही कात्रज संघाची सभा आहे, संघाच्या कामाविषयी बोला, अन्य संस्थांविषयी बोलू नका. सर्व संस्था अजित पवारांच्या मार्गदर्शनाखालीच कार्यक्षमपणे कार्यरत आहेत, अशी सारवासारवही अध्यक्षांसह ज्येष्ठ संचालक विष्णू हिंगे यांना करावी लागली.