बहुचर्चित कात्रज-कोंढवा रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम भूसंपादनाअभावी ठप्प झाल्याने आता डांबरीकरणाचा पर्याय महापालिकेने हाती घेतला आहे. खडीमशीन ते शत्रूजंय मंदिर या दरम्यानचा डांबरीकरणाचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे.
सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या लोकप्रतिनिधींच्या आग्रहाखातर कात्रज येथील राजस सोसायटी ते कोंढवा येथील खडी मशिन चौकापर्यंतच्या सुमारे पावणेचार किलोमीटर लांब आणि ८४ मीटर रुंद बाह्यवळण मार्गासाठी सुमारे १५० कोटी रुपयांची निविदा काढण्यात आली होती. ठराविक ठेकेदार डोळ्यासमोर ठेवूनच या कामाची निविदा काढली गेल्याचा आरोपही त्यावेळी केला गेला होता.
दरम्यान, मुंबईच्या कंत्राटदाराला ३१ डिसेंबर २०१८ मध्ये कार्यआदेश (वर्कऑर्डर) देण्यात आला. तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते लोकसभा निवडणुकीपूर्वी या कामाचे भूमीपूजन करण्यात आले. रूंदीकरणाच्या कामाचा गाजावाजा करून हा प्रकल्प महापालिकेने सुरू केला. तीन वर्षात तो पूर्ण होणे अपेक्षित होते. मात्र रुंदीकरणासाठी १९५ मिळकतींचे भूसंपादन होणे अपेक्षित होते. सध्या केवळ २२ जागाच महापालिकेच्या ताब्यात आल्या आहेत. त्यामुळे आता डांबरीकरणाचा निर्णय महापालिकेने घेतला आहे.
सध्या महापालिकेच्या विविध विभागांच्या कामांमुळे या रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावरून अवजड वाहनांची सातत्याने वर्दळ असते. त्यामुळे वाहतूक कोंडी आणि लहान मोठे अपघात सातत्याने होत आहेत. महापालिकेच्या अतिक्रमण निर्मूलन पथकाने रस्ता परिसारात कारवाई करून रस्ता काही दिवसांपूर्वी मोकळा केला होता. त्यामुळे भूसंपादन प्रक्रियेला वेग येईल, अशी शक्यता निर्माण झाली होती. मात्र जागा मालकांनी वाढीव मोबदला मागितल्याने ही प्रक्रिया थंडावली. त्यामुळे रस्ता रुंदीकरणा ऐवजी डांबरीकरणाचा निर्णय महापालिकेने घेतला आहे. वापरातील रस्ता आणि ताब्यात आलेल्या जागांवर डांबरीकरण करण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे वाहनचालकांना काही प्रमाणात दिलासा मिळण्याची शक्यता आहे.
खडी मशीन ते शत्रूंजय मंदिर या दरम्यानचे डांबरीकरणाचे काम पूर्ण झाले असून शत्रूंजय मंदिर ते राजस सोसायटी हे काम सुरू झाले आहे.