पुणे : ‘गेल्या दहा वर्षांपासून रखडलेल्या कात्रज–कोंढवा रस्त्याच्या भूसंपादनासाठी आवश्यक असलेला सुमारे ४७० कोटी रुपयांचा निधी पुढील दोन महिन्यांमध्ये जिल्हाधिकाऱ्यांकडे जमा करण्यात येणार आहे. त्यानंतर एका वर्षात हे काम पूर्ण करण्यात येणार आहे,’ असे महापालिका आयुक्त नवल किशोर राम यांनी सांगितले.
कात्रज ते कोंढवा या रस्त्याचे काम निधीअभावी आणि भूसंपादनातील अडचणींमुळे दहा वर्षांपासून रखडले आहे. सुरुवातीला रस्त्याची रुंदी ८४ मीटर निश्चित करण्यात आली होती. सातत्याने होणाऱ्या बदलांमुळे आणि वाढलेल्या खर्चामुळे जमिनींचा ताबा घेण्यास विलंब झाला. आता या रस्त्याची ५० मीटर रुंदी गृहीत धरून काम सुरू करण्यात आले आहे.
‘कात्रज चौकातील मिळकत नुकतीच महापालिकेच्या ताब्यात आली असून, तेथे २१० कोटी रुपये खर्च करून उड्डाणपूल उभारण्याचे काम सुरू आहे. राज्य सरकारकडून मिळालेला निधी आणि महापालिकेचा हिस्सा एकत्र करून ४७० कोटींची रक्कम जिल्हाधिकारी कार्यालयात जमा केल्यानंतर या रस्त्याची भूसंपादन प्रक्रिया वेगाने होणार आहे. त्यानंतर रस्त्याचे प्रत्यक्ष काम गतीने पूर्ण होईल,’ असे महापालिका आयुक्त राम यांनी सांगितले.
कात्रज–कोंढवा रस्त्याचे काम गेल्या दहा वर्षांपासून रखडले होते. मात्र, आता या कामाला प्राधान्य देण्यात आले आहे. पुढील वर्षी जून महिन्यापर्यंत संपूर्ण रस्त्याचे काम पूर्ण करण्यात येईल. – नवल किशोर राम, आयुक्त, पुणे महापालिका