समाजमाध्यमावर महिलेला अश्लील संदेश पाठविल्याने सराईत गुन्हेगाराच्या पत्नीसह साथीदारांनी तरुणाचे अपहरण करुन त्याला बेदम मारहाण केल्याची घटना कात्रज भागात घडली. या प्रकरणी पूनम निलेश वाडकर (रा. जनता वसाहत) आणि साथीदारांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत एका तरुणाने भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हेही वाचा- पुणे: चालकास मारहाण करून रिक्षा चोरली; आकुर्डीतील खंडोबा माळ येथील घटना
पूनमचा पती निलेश वाडकर सराइत गुन्हेगार होता. पर्वती पायथा परिसरातील जनता वसाहतीत वर्चस्वाच्या वादातून निलेश याचा दीड वर्षांपूर्वी खून झाला होता. तक्रारदार तरुणाने पूनमला समाजमाध्यमावर अश्लील संदेश पाठविला होता. तरुणाने अनेक महिलांना समाजमाध्यमावर संदेश पाठविल्याचा संशय पूनमला होता. तिने त्याला कात्रज भागातील आंबेगाव खुर्द परिसरात बोलावून घेतले. त्यानंतर पूनम आणि तिच्या साथीदारांनी त्याला वेगवेगळ्या भागात नेले. त्याला बेदम मारहाण करुन शस्त्राने वार केले. निर्जन ठिकाणी तरुणाला सोडून आरोपी पसार झाले. पोलिसांनी तरुणाला रुग्णालयात दाखल केले. पोलीस उपनिरीक्षक कर्चे तपास करत आहेत.