गुलटेकडीच्या फळ बाजारात दररोज १० ते १५ टन आवक

संत्री आणि मोसंबीप्रमाणे आंबटगोड चवीचे किन्नू फळ बाजारात विक्रीसाठी दाखल झाले आहे. बाजारात या फळाला किन्नू संत्री असे म्हटले जाते. राजस्थान, पंजाबमधून किन्नू संत्र्यांची आवक सध्या गुलटेकडीतील घाऊक फळ बाजारात जोमात सुरू झाली आहे. दररोज बाजारात दहा ते पंधरा टन किन्नूची आवक सुरू आहे.

किन्नू संत्र्यांची सर्वाधिक लागवड राजस्थानातील गंगानगर जिल्हय़ातील शेतकरी करतात. त्या खालोखाल पंजाब आणि राजस्थानात किन्नू संत्र्यांची लागवड केली जाते. लिंबूवर्गीय फळ असलेल्या किन्नूची चव संत्री आणि मोसंबीप्रमाणे आंबटगोड आहे. किन्नू फळ म्हणजे संत्री आणि मोसंबीचा संकर आहे. डिसेंबर महिन्यात किन्नू संत्र्यांची आवक सुरू होते. किन्नू संत्र्यांचा हंगाम साधारणपणे मार्चपर्यंत सुरू असतो. सध्या किन्नू संत्र्यांचा हंगाम बहरात आला आहे. राजस्थान, पंजाबमधून गुलटेकडी मार्केट यार्डातील फळ बाजारात दररोज दहा ते पंधरा टन आवक होत आहे, अशी माहिती फळ बाजारातील व्यापारी अरविंद मोरे यांनी दिली.

किन्नू संत्र्यांचे दररोज सहा ते साडेसहा हजार क्रेट (प्लॅस्टिक जाळी) बाजारात विक्रीसाठी दाखल होतात. एका क्रेटमध्ये साधारणपणे वीस किलो माल बसतो. त्यामुळे बाजारात विक्रीसाठी दाखल होणाऱ्या किन्नू संत्र्याला ग्राहकांकडून चांगली मागणी आहे. घाऊक बाजारात किन्नूच्या एका केट्रचा भाव प्रतवारीनुसार ६०० ते ८५० रुपये एवढा आहे. किरकोळ ग्राहक, फळविक्रेते तसेच ज्यूस विक्रेत्यांकडून किन्नू संत्र्याला चांगली मागणी आहे. मार्केट यार्डातील फळ बाजारातून पिंपरी-चिंचवड शहर, पेण, लोणावळा, वाई, महाबळेश्वर भागात किन्नू विक्रीसाठी पाठवली जात आहेत. किन्नू दिसायला आकर्षक असल्याने परगावातील व्यापाऱ्यांकडून मोठय़ा प्रमाणावर खरेदी केली जात असल्याचे मोरे यांनी सांगितले.

नागपूर संत्र्यांचा हंगाम संपला

नागपूर संत्र्यांचा हंगाम अखेरच्या टप्प्यात आला आहे. त्या पाठोपाठ राजस्थान, पंजाबमधून किन्नू संत्री विक्रीसाठी दाखल होत आहे. किन्नू संत्र्यांचा हंगाम सध्या बहरात आहे. येत्या काही दिवसांत आवक आणखी वाढण्याची शक्यता आहे. आवक वाढल्यानंतर प्रतिकिलोचे भाव कमी होतील, असे फळ बाजारातील विक्रेते अरविंद मोरे यांनी सांगितले.

किन्नू संत्र्यांचे प्रतिकिलोचे भाव

घाऊक बाजार- ३० ते ४५ रुपये
किरकोळ बाजार- ६० ते ८० रु.