आपल्या महत्त्वाकांक्षांपर्यंत कसं पोहोचावं.. कॉपरेरेट आयुष्यात येणाऱ्या समस्यांना कसं तोंड द्यायचं.. कामातून निर्माण होणाऱ्या ताणतणावातून कसं मुक्त व्हायचं.. यश-अपयश आणि आनंदाची सांगड कशी घालायची.. आपल्या कामातील कार्यकारणभाव कसा ओळखायचा.. या प्रश्नांची उत्तरे शनिवारी (५ डिसेंबर) मिळणार आहेत आणि तीही समर्थ वाङ्मयाच्या आधारे केलेल्या ‘कॉपरेरेट कीर्तना’च्या माध्यमातून.
कीर्तन ही भारतातच उगम पावलेली आणि विकसित झालेली कला. प्रतिकूल परिस्थितीमध्ये समाजातील सामान्य माणसाला धैर्य आणि शौर्याची शिकवण देत कीर्तनकारांनी प्रबोधनाचे महत्त्वपूर्ण काम केले. कीर्तनामध्ये नारदीय, रामदासी, नाथसंप्रदायाचे आणि वारकरी कीर्तन अशा वेगवेगळय़ा परंपरा आहेत. पूर्वरंगामध्ये तत्त्वज्ञानाच्या आधारे विषयाची सोप्या भाषेत मांडणी करून उत्तररंगामध्ये रामायण, महाभारत या विषयांवर रसाळ वाणीद्वारे केलेले आख्यान ही कीर्तनाची मांडणी असते. त्यामध्ये आता कॉपरेरेट कीर्तनाची भर पडत आहे.
सध्याच्या व्यावहारिक जगामध्ये अनेक समस्यांचे निराकरण कीर्तनाद्वारे करता येऊ शकते. असे कॉपरेरेट कीर्तन अनुभवण्याची संधी पुणेकरांना शनिवारी (५ डिसेंबर) लाभणार आहे. हे युवा कीर्तनकार आहेत पुष्कर औरंगाबादकर. नऊ पिढय़ांची कीर्तनपरंपरा असलेल्या औरंगाबादकर घराण्यातील पुष्कर यांनी कोलकाता येथील ‘इंडियन इन्स्टिटय़ूट ऑफ मॅनेजमेंट’मधून (आयआयएम) एमबीए  केले आहे. राष्ट्रीय कीर्तनकार कमलाकरबुवा औरंगाबादकर यांचे ते नातू आहेत. वाढत्या स्पर्धात्मक वातावरणामुळे आपल्या महत्त्वाकांक्षा शिगेला पोहोचल्या आहेत. अनेक प्रश्न निर्माण झाले असून, त्याचे निराकरण करण्याचा प्रयत्न या कीर्तनाच्या माध्यमातून केला जाणार आहे. शाहीर हिंगे लोककला प्रबोधिनीतर्फे कसबा पेठेतील दादोजी कोंडदेव शाळेत (महापालिका शाळा क्र. ८) सायंकाळी सहा वाजता हे कीर्तन होणार आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Kirtan by mba completed pushkar aurangabadkar
First published on: 02-12-2015 at 03:15 IST