‘वर्ल्ड रेकॉर्ड्स इंडिया’मध्ये नोंद
पुणे : पानशेत धरण फुटीनंतर होडी नदीला आलेल्या पुराच्या पाण्यात घालून १७५ जणांचे प्राण वाचविणारे किसनराव खतिमकर यांच्या या विक्रमाची नोंद ६४ वर्षांनंतर ‘वर्ल्ड रेकाॅर्ड बुक’मध्ये करण्यात आली आहे. त्यासंदर्भातील प्रमाणपत्र खमितकर यांच्या कुटुंबीयांना देण्यात आले आहे. विशेष म्हणजे खडकवासला आणि पानशेत धरणाची नावेही जागतिक विक्रम पुस्तिकेत नोंदविण्यात आली आहेत.
पानशेत धरणफुटीला ६४ वर्षे पूर्ण होत आहेत. १२ जुलै रोजी १९६१ रोजी धरण फुटून शहरात महापूर आला होता. त्या काळी किसनराव खमितकर पेशवे उद्यान येथील तलावाच्या ठिकाणी पर्यटकांना होडीने सफर घडविण्याचा व्यवसाय करीत होते. पानशेत धरण फुटून शहरात पूर आल्यानंतर किसनराव यांनी जिवाची पर्वा न करता होडी पुराच्या पाण्यात घालून १७५ जणांचे प्राण वाचविले होते.
पूरग्रस्त मंगळवार पेठ, भीमपुरा आणि अन्य भागातील लोकांचे प्राण वाचवून त्यांना जीवनदान दिले होते. त्यानंतर त्यांची ‘पानशेत हिरो’ अशी ओळख झाली होती. त्यांच्या या शौर्याची चर्चा शहरात होत असताना, होडी फुटली म्हणून त्यांना मालकाने चक्क कामावरून काढून टाकले होते.
‘त्यांच्या कार्याचा मरणोत्तर गौरव झाल आहे,’ अशी भावना किसनराव यांचे पुतणे संजय यांनी दिली. ‘ यानंतर किसनराव यांना ‘जीवन रक्षा पदक’ देण्यासंदर्भातील फेर अहवालही जिल्हाधिकारी कार्यालयाकडून राज्य शासनाच्या सामान्य प्रशासन विभागाला पाठविण्यात आला आहे.
जीवन रक्षा पदक मिळाले नसल्याची खंत
किसनराव यांना ‘जीवन रक्षा पदक’ द्यावे, यासाठी त्यांचे पुतणे संजय यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. ‘पानशेत पुरामध्ये पावणेदोनशे लोकांचे प्राण वाचविल्याबद्दल काकांना प्रमाणपत्र देण्यात आले होते. मात्र, केंद्र किंवा राज्य शासनाने शासकीय नोकरी द्यावी, यासाठी त्यांनी प्रयत्न केले. काकांसमवेत मी पण अनेक सरकारी अधिकारी आणि नेत्यांना भेटलो. तत्कालीन राष्ट्रपतींचीही भेट घेतली होती. मात्र, त्यांना पुरस्कार किंवा सरकारी नोकरी मिळाली नाही. वयाच्या ६७ व्या वर्षी त्यांचे निधन झाले. मात्र, त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘जीवन रक्षा पदक’ मिळाले नाही, याची अद्यापही खंत आहे,’ असे संजय यांनी सांगितले.