पुणे: देशातील घरांच्या विक्रीत यंदा पहिल्या सहामाहीत मागील वर्षीच्या तुलनेत एक टक्का घट नोंदविण्यात आली आहे. हैदराबादमध्ये घरांच्या विक्रीत सर्वाधिक वाढ, तर मुंबईत सर्वाधिक घट नोंदविण्यात आली आहे. त्याच वेळी पुणे आणि बंगळुरूमध्ये नव्याने सुरू झालेल्या गृहप्रकल्पांची संख्या सर्वाधिक आहे.
‘नाइट फ्रँक इंडिया’ने देशातील प्रमुख आठ महानगरांतील मालमत्ता क्षेत्राचा जानेवारी ते जून या कालावधीचा अहवाल जाहीर केला आहे. मुंबई, दिल्ली, बंगळुरू, पुणे, चेन्नई, हैदराबाद, कोलकता आणि अहमदाबाद या शहरांचा यात समावेश आहे. या अहवालानुसार, यंदा पहिल्या सहामाहीत १ लाख ५६ हजार ६४० घरांची विक्री झाली. मागील वर्षी पहिल्या सहामाहीतील विक्रीच्या तुलनेत त्यात १ टक्क्यांची घट आहे. याच वेळी मागील वर्षातील जुलै ते डिसेंबर सहामाहीपेक्षा ही विक्री १.७ टक्के अधिक आहे. या वर्षी नवीन गृहप्रकल्पांची संख्या १ लाख ७३ हजार ३६४ वर पोहोचली असून, मागील वर्षीच्या तुलनेत त्यात ८ टक्के वाढ झाली आहे.
आणखी वाचा-पुण्यात घर घेणे महागले! परवडणाऱ्या घरांच्या विक्रीतही झाली घट
हैदराबाद, दिल्ली, कोलकता आणि चेन्नई या महानगरांमध्ये घरांच्या विक्रीत वाढ नोंदविण्यात आली आहे. याच वेळी बंगळुरू आणि मुंबईमध्ये घट झाली आहे. असे असले, तरी देशातील एकूण घरांच्या विक्रीत मुंबईचा वाटा सर्वाधिक २६.०४ टक्के आहे. पहिल्या सहामाहीमध्ये मुंबईत ४० हजार ७९८ घरांची विक्री झाली. दिल्ली १९.२२ टक्क्यांसह दुसऱ्या स्थानी असून, तेथील घरांची विक्री ३० हजार ११४ आहे. देशातील घरांच्या विक्रीत बंगळुरू १६.७५ टक्के, पुणे १३.८३ टक्के, हैदराबाद ९.८० टक्के, अहमदाबाद ५.०९ टक्के, कोलकता ४.६७ टक्के आणि चेन्नई ४.५६ टक्के असे प्रमाण आहे. घरांची विक्री बंगळुरू २६ हजार २४७, पुणे २१ हजार ६७०, चेन्नई ७ हजार १५०, हैदराबाद १५ हजार ३५५, कोलकता ७ हजार ३२४ आणि अहमदाबाद ७ हजार ९८२ अशी आहे.
पहिल्या सहामाहीत घरांची विक्रीत चांगली राहिली आहे. मध्यम व मोठ्या आकाराच्या घरांना ग्राहकांकडून अधिक मागणी आहे. याच वेळी परवडणाऱ्या घरांच्या संख्येत घट होत आहे. गृहनिर्माण क्षेत्रातील सकारात्मक वाढीमुळे नवीन गृहप्रकल्पांची संख्याही वाढत आहे. -शिशिर बैजल, अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक, नाइट फ्रँक इंडिया
घरांच्या किमतीत १० टक्क्यांपर्यंत वाढ
यंदा देशभरात घरांच्या किमतीत २ ते १० टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे. सर्वाधिक वाढ हैदराबादमध्ये १० टक्के झाली आहे. त्याखालोखाल मुंबई ६ टक्के, दिल्ली व बंगळुरू प्रत्येकी ५ टक्के, अहमदाबाद ४ टक्के, पुणे व चेन्नई प्रत्येकी ३ टक्के अशी आहे. सर्वांत कमी वाढ कोलकत्यात २ टक्के झाली आहे.