पुणे : गेली काही वर्षे मध्यरात्री पार पडणारी पुणे मॅरेथॉन या वेळी ब्राह्मवेलेत ३.३० वाजताच पार पडली. पूर्ण ४२ कि.मी. अंतराच्या शर्यतीत केनियाच्या धावपटूंनी वर्चस्व राखले असले, तरी या वेळी २१ कि.मी. अर्ध मॅरेथॉन शर्यतीत भारताला दिलासा मिळाला. कोल्हापूरच्या उत्तम पाटीलने सर्वोत्तम सरस वेळ देत (१ तास ६ मिनिट २ सेकंद) ही शर्यत जिंकली.
सणस मैदानापासून सिंहगड रस्त्यामार्गे नांदेड सिटीमधील सर्कलला वळसामारून परत सणस मैदानावर संपन्न झालेल्या २१ कि.मी. शर्यतीत अर्थातच केनियाच्या धावपटूंचे वर्चस्व होते. जथ्थ्याने धावत केनिया आणि इथियोपियाच्या धावपटूंनी सुरुवातीला आघाडी घेतली होती. राष्ट्रीय स्तरावर चमकदार कामगिरी करणारा आणि आपली ओळख निर्माण करू पाहणारा उत्तम पाटिल त्यांच्याच मागून धावत होता. परदेशी धावपटूंचा वेग त्याच्यासमोर आव्हान उभे करत होता. पण, त्याचवेळी तो वेग त्याला प्रेरित देखिल करत होता.
आणखी वाचा-पुणे : ‘मिकी आणि मेमसाहेब’ नाटकाची उद्या सुवर्णमहोत्सवपूर्ती
सुरुवातीपासून वेग घेतल्याने एका वेळेस केनियन धावपटू दमल्यासारखे वाटले. तेव्हा शर्यतीच्या आठ कि.मी. अंतरावर सर्व प्रथम उत्तमने या परदेशी धावपटूंच्या जथ्थ्याला गाठले. काही अंतर त्यांच्या बरोबर धावल्यानंतर उत्तमने वेग वाढवत या जथ्थ्यातून बाहेर पडत आघाडी घेतली. परदेशी धावपटूंना मागे टाकल्याने उत्तमचा विश्वास दुणावला आणि त्याने टप्प्याटप्प्याने वेग वाढवत नेत केनियन धावपटू आपल्याला गाठणार नाहीत याची काळजी घेतली आणि आघाडी वाढवत सर्वोत्तम वेळेस ह सर्वात प्रथम अंतिम रेषा गाठली.
शर्यत जिंकल्याचा आनंद उत्तमच्या चेहऱ्यावरून ओसंडून वहात होता. शर्यत जिंकण्यापेक्षा त्याला आपण केनियन धावपटूंना मागे टाकल्याचा अधिक आनंद झाला होता. उत्तम म्हणाला, शर्यत चांगलीच झाली. परदेशी धावपटूंचे आव्हान अपेक्षेप्रमाणे होते. त्यांच्यासमोर टिकून राहू याची खात्री होती, पण जिंकू असे अजिबात वाटले नव्हते. सकाळच्या थंडीत झालेल्या शर्यतीमुळे मला वेघ वाढवणे आणि सरस वेळ देणे शक्य झाले. केनिन धावपटूंना मागे टाकल्यावर विश्वास उंचावला आणि नंतर मागे वळूनही पाहिले नाही. मला फक्त अंतिम रेषाच दिसत होती, अशी प्रतिक्रिया उत्तम पाटीलने जिंकल्यानंतर व्यक्त केली.
आणखी वाचा-महिला कैद्यांसाठी देशातील पहिले खुले कारागृह येरवड्यात
दरम्यान, पुरुष, महिला पूर्ण मॅरेथॉनसह महिला अर्ध मॅरेथॉनमध्ये परदेशी धावपटूंचेचे वर्चस्व राहिले. पुरुषांच्या अर्धमॅरेथॉन शर्यतीतही दुसरा, तिसरा क्रमांका परदेशी धावपटूंचा आला. पण, ही शर्यत भारतीय धावपटूने जिंकली हे सर्वात महत्वाचे ठरले. पुरुषांची पूर्ण मॅरेथॉ़न जिंकताना केनियाच्या केमेई एलिआस किपरेनोने २तास १६ मिनिट ४५ सेकंद अशी वेळ दिली. त्याचेच सहकारी सायमन मईना एम्बांगी आणि अडेरे नेमाश हैलू हे अनुक्रमे दुसऱ्या तिसऱ्या स्थानावर आले. महिलांची पूर्ण मॅरेथॉनरोबा बाटी हैलूने जिंकताना ३ तास ११ मिनिट ०९ सेकंद वेळ दिली.
निकाल – पूर्ण मॅरेथॉन (४२ कि.मी.) पुरुष – केमेई किपरोनो (केनिया, २ तास १६ मिनिट ४५ सेकंद) सायमन मईना, अडेरे नेमाश हैलू, महिला – रोबा बाटी हैलू (३ तास ११ मिनिट ९ सेकंद), जिग्नेट डोल्मा, चेबेट सुसान
अर्ध मॅरेथॉन (२१ कि.मी) उत्तम पाटील (कोल्हापूर, १ तास ६ मिनिट २ सेकंद), निकोलस किपलगट रुगुट, वाल्ह टेबेई किनेटो