पुणे : एकीकडे पुस्तक महोत्सवांना मिळणारा प्रतिसाद उदंड असला, तरी शहरातील काही खासगी वाचनालये, पुस्तक दालने बंद पडत असल्याचीही वस्तुस्थिती समोर आली आहे. मात्र, याचा थेट वाचनसंस्कृतीशी संबंध लावता येणार नाही, ती वेगळ्या स्वरूपात वृद्धिंगत होत आहे, असे ग्रंथप्रसारकांचे म्हणणे आहे.
कोथरूड येथील ‘भावार्थ’ हे पुस्तक दालन सध्या बंद होण्याच्या मार्गावर असल्याने त्याची मोठी चर्चा आहे. या दालनामध्ये असलेल्या पुस्तकांची सवलतीच्या दरात विक्री करण्याचा निर्णय संचालकांनी घेतला असून, २५ ऑगस्टपर्यंत सवलतीच्या दरात पुस्तक विक्री केली जाणार आहे.
‘मराठी पुस्तकांना वाहिलेले स्वतंत्र पुस्तक दालन असावे, या विचारातून कोथरूडमध्ये ‘भावार्थ’ची सुरुवात झाली. जुलै २०२२मध्ये ‘भावार्थ’ सुरू झाले. पुस्तकविक्रीला विविध कार्यक्रम, उपक्रमांचीही जोड देण्यात आली. गेल्या तीन वर्षांत पुस्तक, लेखकांशी संबंधित अनेक कार्यक्रम झाले. मात्र, अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे व्यावसायिक अडचणी निर्माण झाल्याने नाईलाजास्तव दालन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. दालन बंद होणार असल्याची माहिती समजल्यावर अनेकांनी संपर्क साधला. मात्र, आता ती वेळ निघून गेली आहे. पुस्तकांची दालने, ग्रंथालयांना वाचकांनी प्रतिसाद दिला, तर वाचन संस्कृती टिकून राहण्यास मदत होईल,’ असे ‘भावार्थ’चे प्रसाद करंदीकर आणि कोरगावकर यांनी सांगितले.
दिनेश जोशी यांनी त्यांच्या बंधूंसह ‘शिल्पा वाचनालय’ या नावाने गेली ५० वर्षे बाजीराव रस्ता येथे खासगी वाचनालय चालवले. त्यांच्या वाचनालयात सुमारे १५ हजार पुस्तके होती. मात्र, त्यांनीही नुकतेच ते बंद केले. ‘सन १९७५ मध्ये भाड्याच्या जागेत वाचनालय सुरू केले. वाचनालयाला उत्तम प्रतिसाद होता. सहाशेपेक्षा जास्त सभासद होते. या प्रतिसादामुळे १९८५मध्ये वाचनालय मोठ्या जागेत नेले. लहान मुलांना लहानपणापासून वाचनाची गोडी लागावी, म्हणून बालसाहित्य उपलब्ध केले होते. लहान मुले आवडीने पुस्तके घ्यायची. त्याशिवाय मासिके, कथा, कादंबऱ्या अशा सर्व प्रकारच्या साहित्याचा वाचनालयात समावेश होता. सन २०००पर्यंत वाचनालयाला चांगला प्रतिसाद होता. अनेकांचे पेठेतून स्थलांतर होऊ लागल्यावर सभासद संख्या कमी होत गेली. नोकरी सांभाळून आम्ही ५० वर्षे वाचनालय चालवले. आता, घटलेल्या प्रतिसादामुळे नुकतेच वाचनालय बंद केले,’ असे जोशी यांनी सांगितले.
दरम्यान, चकचकीत पुस्तक दालनाचे आर्थिक गणित जुळत नाही. पेठांतील वाचनालये, ग्रंथालयांमध्ये येणे-जाणे सोयीचे होत नाही. पुस्तकांची जुनी दुकाने मात्र अजूनही टिकून आहेत. घरपोच पुस्तके देणारी ग्रंथालये, वाचनालये सुरू आहेत. त्यामुळे वाचनसंस्कृती आणि बंद पडणारी ग्रंथालये, वाचनालये, पुस्तक दुकाने यांचा थेट संबंध लावता येणार नाही. – प्रसाद भडसावळे, ग्रंथपाल आणि ग्रंथप्रसारक