पुणे : टोळक्याने कोयते उगारून दहशत माजविल्याची घटना कोंढवा भागात घडली. टोळक्याने एका वैमनस्यातून एका तरुणावर कोयत्याने वार केले. दहशत माजविणे, तसेच खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी कोंढवा पोलिसांनी सात जणांना अटक केली. याप्रकरणी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे.
तन्वीर अक्रम शेख (वय १९), सुरेंद्र उर्फ अमर भुवनेश्वर साव (वय १९), राजू उर्फ राजा संगप्पा गुळकर (वय १८), कैलास बाबुराव गायकवाड (वय २२), कवीराज उर्फ केडी सुदाम देवकाते (वय १९), प्रेम उर्फ पप्या यल्लेश घुंगरनी (वय २२), यश अंबर सोनटक्के (वय १८) अशी अटक करण्यात आलेल्यांची नावे आहेत.
याप्रकरणी दोन अल्पवयीनांना ताब्यात घेण्यात आले आहे. आरोपी बिबवेवाडी-कोंढवा रस्त्यावर राहायला आहेत. याबाबत एका तरुणाने कोंढवा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणाचा आरोपींशी वाद झाला होता.
११ जुलै रोजी रात्री दहाच्या सुमारास तो कात्रज-कोंढवा रस्त्यावरील गोकुळनगर भागात गप्पा मारत थांबला होता. त्या वेळी आरोपी दुचाकीवरुन तेथे आले. त्यांनी कोयते उगारून परिसरात दहशत माजविली. वैमनस्यातून तरुणावर कोयत्याने वार करुन आरोपी पसार झाले. पसार झालेल्या सात आरोपींना पोलिसांनी अटक केली, असून त्यांच्याबरोबर अल्पवयीन साथीदारांना ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस उपनिरीक्षक खोपडे तपास करत आहेत.
उधारीवर सिगारेट न दिल्याने जिवे मारण्याची धमकी
उधारीवर सिगोरट न दिल्याने दोघांनी दुकानदाराला कोयत्याचा धाक दाखवून जिवे मारण्याची धमकी दिल्याची घटना उत्तमनगर भागात घडली. याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली असून, अल्पवयीनाला ताब्यात घेण्यात आले आहे. याप्रकरणी गमेश कांबळे याच्यासह साथीदारांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत एका किराणा माल दुकानादारने उत्तमनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदारांचे उत्तमनगर भागात किराणा माल विक्री दुकान आहे. आरोपी ११ जुलै रोजी दुपारी दुकानात आले. त्यांनी किराणा माल दुकानदाराकडे उधारीवर सिगारेट मागितली. उधारीवर सिगारेट न दिल्याने आरोपींनी दुकानदाराच्या गाळ्याला कोयता लावून जिवे मारण्याची धमकी दिली. त्यानंतर गल्ल्यातील पाच हजार रुपयांची रोकड लुटून आरोपी पसार झाले. घाबरलेल्या दुकानदाराने पोलिसांकडे तक्रार दिली. सहायक पोलीस निरीक्षक मुलाणी तपास करत आहेत.