पिंपरी-चिंचवडचे नवे पोलीस आयुक्त अंकुश शिंदे यांनी आज आयुक्तालयाचा पदभार स्वीकारला. यावेळी अपर पोलीस आयुक्त संजय शिंदे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. व्हाइट कॉलर गुन्हेगारी बाबत प्रश्नावर त्यांनी सूचक इशारा देत सर्व करू असं म्हटलं आहे. त्यामुळे त्यांचं विशेष लक्ष व्हाइट कॉलर गुन्हेगारीवर असेल असे संकेत मिळत आहेत. पिंपरी-चिंचवडचे माजी पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश यांची मुंबईत बदली झाली. त्यांची अचानक तडकाफडकी बदली झाल्याने तर्क-वितर्कांना उधाण आलं आहे.

दरम्यान, कृष्ण प्रकाश जागी मुंबईत विशेष पोलीस महानिरीक्षक सुधार सेवा येथे कार्यरत असणारे अंकुश शिंदे यांनी पदभार स्वीकारला आहे. अंकुश शिंदे हे पहिल्यांदाच पुणे जिल्ह्यात काम करणार असल्याचं त्यांनी स्वतः सांगितलं. या अगोदर त्यांनी गडचिरोली, सोलापूर येथे काम केल्याचंही त्यांनी आवर्जून सांगितलं. सोलापूरमध्ये त्यांनी व्हाइट कॉलर गुन्हेगारीला आळा घातला होता असं सांगितलं जातं. तशा आठवणी अनेक पोलीस अधिकाऱ्यांनी बोलून दाखवल्या आहेत. त्यामुळे आज पदभार स्वीकारल्यानंतर माध्यम प्रतिनिधींनी त्यांना “तुम्ही व्हाइट कॉलर गुन्हेगारीवर आळा घालणार का?” असा प्रश्न विचारताच “सगळं करू”, असा सूचक इशारा त्यांनी दिला आहे.

कृष्ण प्रकाश परदेशात असतानाच त्यांची पिंपरी-चिंचवडच्या पोलीस आयुक्त पदावरुन बदली; अनेकांच्या भुवया उंचावल्या

This quiz is AI-generated and for edutainment purposes only.

पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या स्थापनेपासून गेल्या साडेतीन वर्षात शहराला चार पोलीस आयुक्त लाभले आहेत. आतापर्यंतच्या तीनही पोलीस आयुक्तांना आपला कार्यकाळ पूर्ण करता आलेला नाही. पोलीस आयुक्त कृष्ण प्रकाश रजेवर असताना त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याने पोलीस दलात त्यांच्या बदलीची चर्चा आहे. सप्टेंबर २०२० मध्ये कृष्ण प्रकाश यांची पोलीस आयुक्तपदी वर्णी लागली. मात्र, दीड वर्षातच त्यांची अचानक बदली करण्यात आली. कृष्ण प्रकाश काही दिवसांपासून रजेवर होते आणि ते परदेशात गेले होते. अशा वेळी त्यांची बदली करण्यात आल्याने अनेक तर्क लढवण्यात येत आहेत.