मुक्ता मनोहर (कामगार नेत्या)

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शाळेमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धा आणि वादविवाद स्पर्धेमध्ये मी सहभाग घेत होते. त्यासाठी म्हणून वाचनाचा छंद लागला. वाचन करताना केवळ पुस्तके आणि त्यातील लेखन आवडले म्हणून नाही, तर लेखकाला नेमके जे म्हणायचे आहे, ते मला समजले का, हे मी पडताळून पाहात असे. त्यामुळे प्रत्येक पुस्तकाशी माझे भावनात्मक नाते जोडले गेले.

शाळेमध्ये असताना वक्तृत्व स्पर्धा आणि महात्मा जोतिबा फुले यांच्या जन्मदिनानिमित्त झालेल्या वादविवाद स्पध्रेत सहभाग घेतला होता. तेव्हा वर्तमानपत्रातील लेख वाचून मुद्दे काढून भाषण केले. त्या वेळी मला बक्षीस मिळाले. तेव्हापासून सुरू झालेली वाचनाची वाटचाल आज कामगारांमध्ये किंवा चळवळीत काम करीत असताना तितक्याच वेगाने जगण्याला दिशा देत आहे. आजही किती आणि काय वाचावे, हा प्रश्न माझ्या मनाला नेहमी पडतो. ज्ञानाचा अथांग सागर आपल्या सभोवती आहे आणि त्यातील पुस्तकांचे मोती आपण केवळ निवडायचे आहेत, ही भावना मनाला सुखावणारी आहे. त्यामुळे पुस्तके ही माझ्या जगण्याचे जणू संदर्भच बनली आहेत.

लहानपणी आम्ही मित्र-मत्रिणी मिळून चांदोबासारख्या मासिकापासून ते भा. रा. भागवत यांच्या कथांपर्यंत विविध पुस्तके वाचायचो. माझे काका आजोबा (त्र्यंबक करंजीकर) यांच्याकडे चांदोबा असायचे. त्या वेळी चांदोबा वाचताना त्यातील प्राणी-पक्षी आपल्याशी बोलत आहेत, असा भास होत असे. वाडय़ामध्ये राहात असल्याने आजूबाजूला गोंधळ, आवाज मोठय़ा प्रमाणात होता, परंतु तरीही शेजारील केळकरांच्या खिडकीमधून पाहिल्यावर कुमार मासिकासारखी पुस्तके मुले वाचतानाचे दृश्य आम्ही पाहायचो. त्याच वेळी मनात इतर पुस्तकांविषयी उत्सुकता निर्माण झाली आणि पुस्तकांशी कळत नकळत नाते जोडले गेले. घरामध्ये वाचन आणि पुस्तकांना पोषक असे वातावरण फारसे नव्हते. परंतु मी इयत्ता आठवीमध्ये असताना वडिलांनी (श्रीपाद करंजीकर) ‘पण लक्षात कोण घेतो’ ही कादंबरी आणली आणि मी ती वाचू लागले. एकदा बाबांनी साडी घ्यायला दिलेल्या ४०० रुपयांमधून मी साडीऐवजी पुस्तकांची खरेदी केली आणि बाबांना हे कळताच त्यांनी त्यावर कविता लिहून मला प्रोत्साहन दिल्याची आठवण आजही तितकीच ताजी आहे. त्यामुळे आजही कितीही वाचन केले, तरी अपूर्णतेची जाणीव माझ्या मनाला वाटते.

साधारण १९७५च्या सुमारास स्त्रीमुक्तीची चळवळ रुजू लागली होती. त्या वेळी माझे पती अशोक मनोहर हे पूर्णवेळ चळवळीत होते. त्यामुळे कळत नकळत मीही त्यामध्ये सामावून गेले आणि विविध विषयांवरील पुस्तके वाचून त्यावर होणाऱ्या चच्रेत सहभाग घेत होते. आयुष्य समृद्ध करायचे असेल तर पुस्तक आणि वाचनाशिवाय पर्याय नाही, हा वस्तुपाठ मला त्या वेळी मिळाला. पुण्यात मी साधारण १९७१च्या सुमारास आले होते. तत्कालीन पुणे विद्यापीठातून पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. आम्ही अभ्यास मंडळ घेत असू. त्यामध्ये वसंतराव तुळपुळे यांचे कॅपिटल, शांताबाई रानडे यांच्या मराठी पुस्तकांचा संदर्भ घेत होतो. इंग्रजीत वेगाने वाचन कसे करावे, यासाठी रा. प. नेने यांचे मार्गदर्शन घेत असू. चळवळीत काम सुरू झाले असल्याने गंगाधर चिटणीस यांच्या ‘मंझिल अजून दूरच’सारख्या पुस्तकांनी आम्हाला प्रकाशाच्या वाटा दाखवल्या. तर अरुंधती रॉय ही माझी आवडती लेखिका. वाचन करताना केवळ पुस्तके आणि त्यातील लेखन आवडले म्हणून नाही तर लेखकाला नेमके जे म्हणायचे आहे, ते मला समजले का, हे मी पडताळून पाहात असे. त्यामुळे प्रत्येक पुस्तकाशी माझे भावनात्मक नाते जोडले जात होते.

तरुणपणी कितीही वाचन केले तरी आपले ज्ञान तोकडेचे आहे, ही भावना असे. त्यामुळे ज्ञान अखंडपणे वाढत राहावे, यासाठी वाचनप्रवास सातत्याने सुरू होता. भालचंद्र नेमाडे, मार्कवेज, चेकॉव, टॉलस्टॉय, रवींद्रनाथ टागोर यांच्या पुस्तकांपासून ते अगदी पु. ल. देशपांडे यांच्या लेखनापर्यंतचे विविधांगी साहित्य मला आवडते. लेखकांना त्याबद्दल मी आवर्जून कळवीत असे. माझ्या लहानपणी असेच एकदा प्र. के. अत्रे यांचा लेख वाचून मी लिहिलेल्या पत्राचा किस्सा आठवला की घरामध्ये आजही हशा पिकतो. परंतु किंबहुना त्यामुळेच मी आज लेखकांशी मुक्त संवाद साधण्याचे धाडस करू शकले. विजय तेंडुलकर, विद्या बाळ, छाया दातार यांच्याशी झालेल्या ओळखी साहित्यसंपदेमुळेच दृढ झाल्या. कामगार चळवळीत काम करीत असल्याने औद्योगिक क्रांतीसह त्यासंबंधीचे वाचन सुरू होते. तर इंग्लंडमधील क्रांती, अमेरिकन स्वातंत्र्य युद्ध, रशियन क्रांती, कायदेविषयक पुस्तके आणि सुलभा ब्रह्मे यांनी विविध विषयांवर लिहिलेल्या पुस्तिका माझ्या संग्रही आहेत.

कालांतराने ज्या वेळी मी स्त्री मासिकाच्या कार्यालयात जात असे, तेव्हा समग्र फुले, आगरकर, महर्षी कर्वे यांच्याविषयी वाचनाला सुरुवात झाली. न पटणाऱ्या गोष्टींचे वाचन आपल्याकडून व्हायला हवे, असे मला नेहमी वाटे. त्यामुळे विविध विषयांवरील पुस्तके मी आवर्जून वाचते. याशिवाय संतवाङ्मयाचे मला विशेष आकर्षण आहे. संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम यांच्यापासून ते डॉ. सदानंद मोरे यांच्या साहित्यापर्यंत अनेक ग्रंथ माझ्या बुकशेल्फमध्ये आहेत. सध्या विज्ञान-तंत्रज्ञानाचे युग असल्याने मोबाइल आणि किंडलसारख्या साधनांचा वापर मोठय़ा प्रमाणात होतो. त्यामुळे एखाद्या पुस्तकाचा परिचय मी मोबाइलद्वारे इंटरनेटवर वाचून ऑनलाइन पुस्तकांची खरेदी करते. याशिवाय गोखले इन्स्टिटय़ूट, ब्रिटिश कौन्सिल, हिंदी राष्ट्रभाषा ग्रंथालयाची मी सभासद होतेच. त्यामुळे हिंदीतील अनुवादित अनेक पुस्तके मी त्या वेळी वाचून काढली.

वाचन आणि लेखनामुळे माणसाला स्वत:चा शोध लागतो, अशी माझी धारणा आहे. त्यामुळे मराठी नाटकातील स्त्री प्रतिमा या पुस्तकाचे लेखन करताना नाटके पाहण्यापासून त्याविषयी वाचनापर्यंत अनेक गोष्टी मी केल्या. त्यासोबतच माध्यम ग्रुपच्या माध्यमातून पथनाटय़े केली. त्याची संहिता मी लिहित असे. कहाणी मानवाची, पुराणकथा आणि वास्तव, मानवी संस्कृती अशी पुस्तके त्या काळी माझ्या वाचनात आली. तर त्यानंतर ‘नग्न सत्य’सारखे पुस्तक लिहिताना संपूर्ण वर्षभर निरनिराळय़ा साहित्याचे वाचन केले. महिलावर्ग आणि कामगार मोठय़ा प्रमाणात अशिक्षित असल्याचे चित्र माझ्यासमोर होते आणि आजही थोडय़ा बहुत प्रमाणात असेच आहे. त्यामुळे त्यांनी थोडे फार वाचावे, असे मला वाटते. त्यासाठी विविध ठिकाणी वस्तीवरील मुलांना पुस्तकांची भेट देण्याचा उपक्रम आम्ही सुरू केला आहे. त्यासोबतच कार्यक्रमांना हार-गुच्छांवर अवास्तव खर्च करण्यापेक्षा पुस्तके देण्याचा नियमही घालून घेतला आहे. त्यामध्ये ‘प्रकाशवाटा’ आणि ‘आनंदवन’ ही पुस्तके देण्याचा आमचा प्रयत्न असतो.

वैचारिक वाचनापेक्षा कामगार वर्ग गाणी आणि कवितांच्या माध्यमामध्ये रमू शकतो, अशी कल्पना समोर आली. त्यामुळे विंदा करंदीकर, नामदेव ढसाळ यांच्या अनेक कवितांना चाली लावून मी कामगारांना त्या कविता शिकवल्या आहेत. कामगार चळवळीमध्ये जनजागृतीसाठी हा काव्यात्मक प्रयत्न करण्याची संधी मला मिळाली हे माझे भाग्य. पुस्तकांची मत्री करताना ती आपल्या जगण्याचे संदर्भ कधी होऊन जातात, हे खरंच कळत नाही. त्यामुळे प्रत्येकाने जीवनात एकदा तरी पुस्तकांशी नाते जोडायला हवे.

शब्दांकन : वीरेंद्र विसाळ

Pune News (पुणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Labor leader mukta manohar bookshelf
First published on: 26-05-2017 at 02:23 IST